गुप्तहेर रॉबिन आणी कुटीरोवांचं शस्त्र - भाग ४

 

दुपारचं ऊन सरून संध्याकाळ होत आलेली होती. दत्त नगरजवळील वस्तीमध्ये आतल्या गल्ल्यांमध्ये माणसांची जरा वर्दळच होती. उन कमी झाल्याने लहान मुले गल्ल्यांमध्ये खेळत होती, वयोवृद्ध लोकं घराच्या बाहेर उभी राहून शेजारच्यांशी चकाट्या पिटत उभी होती. घरातल्या कर्त्या पुरुषाची कामावरून येण्याची वेळ झाल्याने त्यांच्या बायका स्वयंपाकाची तयारी करण्यात गुंतल्या होत्या. दत्तनगरच्या आसपासच संध्याकाळच्या सुमारासच हे नेहमीचच वातावरण होतं. वस्तीमध्ये बरीच छोटी मोठी घरे होती. आता म्हणायला वस्ती असली तरी तेथील घरे हि पक्क्या स्वरूपाचीच होती. तिथली लोकं पोटापुरत कमावत होती. आणी दोन खोल्यांचा घरात निवांत राहत होती. गल्ल्यांचा पुढे मुख्य रस्त्याला चिटकून काही दुकाने आणी छोट्याश्या टपऱ्या पण होत्या. त्यातल्याच एका टपरीजवळ उभं राहून रॉबिन शांतपणे सिगारेट ओढत टपरीवाल्याशी गप्पा मारत उभा होता. आत्ताच टपरीवाल्याला त्याचे हात ओले करून त्याने माहिती मिळवली होती कि कमलाबाई ह्या आतमधल्या गल्ल्यांच्या रांगेत शेवटच्या दोन खोल्यांमध्ये आपल्या नवरा आणी लहान मुलीसोबत राहतत. नवरा एका छोट्या कंपनीच्या गेटवर वॉचमन म्हणून रात्रपाळीत काम करत होता आणी छोटी मुलगी शाळेत शिकत होती. काही वेळातच कमलाबाई देसाई वाड्यावरची कामं आटोपून घरी येतील असा रॉबिनचा कयास होता आणी त्यांचीच वाट पाहत मुख्य रस्त्याकडे नजर ठेवून रॉबिन उभा होता. मालतीबाईचा मृत्यू झाला तेव्हा कमलाबाई वाड्यामध्येच होत्या एवढचं न्हवे तर मालतीताई जमिनीवर पडलेल्या कमलाबाई यांनीच आधी पाहिलं होतं. वाड्यावर कमलाबाईची चौकशी करण रॉबिनला रास्त वाटलं नाही कारण कदाचित अविनाश समोर त्यांना जास्त बोलता आला नसतं. त्यामुळेच कमलाबाई यांची चौकशी त्यांच्याच घरात जाऊनच करणे रॉबिनला क्रमप्राप्त वाटत होतं. संध्याकाळी कमलाबाई यांचा नवरा घरात नसतो, कमलाबाई आणी त्यांची मुलगीच असते त्यामुळे घरात जाऊन चौकशी केल्याने कमलाबाई कोणतेही दडपण न घेता सगळ्या गोष्टी इत्यंभूत सांगतील असा रॉबिनचा अंदाज होता. वाड्यावर कमलाबाईनी रॉबिनला पाहिलं असल्याने त्या लगेचच ओळखतील असा विश्वास रॉबिनला वाटत होता. रॉबिन आपल्याच विचारांमध्ये मग्न होऊन सिगारेट ओढत शांतपणे उभा असतानाच त्याचं लक्ष मुख्य रस्त्याकडे गेलं.

हातातली कापडी पिशवी सांभाळत डोक्यावर पदर घेऊन काष्टा घातलेली कमलाबाई लगबगीने मुख्य रस्ता ओलांडून आतमधल्या गल्ल्यांमध्ये प्रवेश करत होती. तिला असं येताना पाहताच रॉबिन जरा टपरीच्या आडोशाला सरकला आणी कमलाबाई गल्लीतून पुढे जाण्याची वाट पाहू लागला. काही वेळातच कमलाबाई लगबगीने टपरीपुढून समोरच्या गल्लीत निघून गेली. ती लगबगीने घरी जात असल्याने तिने रॉबिनला पाहण्याचा प्रश्नच न्हवता. कमलाबाई पुढे गेली आहे याची खातरजमा करून रॉबिनने हातातली सिगारेट खाली टाकून विझवली आणी ठराविक अंतर ठेवून कमलाबाईच्या मागोमाग जाऊ लागला. असा प्रसंग येणार हे रॉबिन ला ठावूक होतं म्हणूनच रॉबिनने आज त्याची मोटारसायकल न आणता चालतच तो या ठिकाणी आला होता. जेणेकरून कोणाचही लक्ष त्याचाकडेन न जाता त्याला सावकाशपणे कमलाबाईच्या मागे जाता यावं. काही वेळातच कमलाबाई आपल्या दोन खोल्यांचा घरापाशी येऊन ठेपली आणी दरवाजा लोटून आतमध्ये निघून गेली. रॉबिन अगदी शांतपणे चालत येत होता. काही वेळातच तोही कमलाबाईच्या घराजवळ येऊन पोहोचला. थोडा थांबून त्याने दारावर टकटक केली. आणी तसा आतून आवाज आला- “ कोन हाये”

“ मी गुप्तहेर रॉबिन, आपण देसाईच्या वाड्यावर भेटलो होतो. तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. ” रॉबिनने बाहेरूनच आवाज दिला. यावर आतून काहीच प्रतिसाद आला नाही. पण थोड्या वेळातच दरवाजा उघडला गेला आणी डोक्यावर पदर घेऊन कमलाबाई दरवाजा उघडून उभी राहिली.

“ नमस्कार मला ओळखलंत ना तुम्ही “ रॉबिन हात जोडून थोडसं स्मित करत म्हणाला.

कमलाबाई काहीशी भांबावलेल्या स्थितीत उभी होती. कारण अचानक रॉबिन आपल्या घरापाशी येऊन उभा ठाकेल असं तिला वाटलं न्हवत. आणी तसंही आपल्याकडे रॉबिनचं काय काम असेल याने ती गोंधळली होती. तिच्या चेहऱ्यावरचे हे सगळे भाव रॉबिनने भराभर टिपले आणी कमलाबाईला विश्वासात घेत म्हणाला.

“ कमलाबाई काळजी करू नका, वाड्यामधल्या नुकत्याच घडलेल्या प्रकरणाबद्दल मला थोडीशी माहिती हवी होती. तुम्ही अजिबात काळजी करू नका मी तुमच्या मालकीणबाईना न्याय मिळवून देण्यासाठीच पोलिसांच्या सांगण्यावरूनच तपास करतोय.” रॉबिन मनमोकळ हास्य करत म्हनला.

रॉबिनचा हसरा चेहरा पाहून कमलाबाई जरा निश्चिंत झाल्या कारण नाही म्हटलं तरी पोलिसांच्या प्रकरणात नसती ब्याद ओढवून घेण्यात त्यांना काहीही स्वारस्य न्हवत. बाहेर जरा अंधार पडू लागला होता. कमलाबाईनी रॉबिनला आत बोलावून घेतल. रॉबिन घराच्या आतमध्ये आला आणी दाराजवळच्याच लाकडी खुर्चीवर विसावला. कमलाबाई आत स्वयंपाक घरात गेली. समोरच लोखंडी कॉटवर कमलाबाईची मुलगी अभ्यास करत बसली होती, रॉबिन आत येताच ती किलकिल्या डोळ्यांनी रॉबिनकडे पाहू लागली. रॉबिनने तिच्याकडे पाहून हलकेच स्मितहास्य केलं आणी घराचं निरीक्षण करू लागला. ते दोन खोल्यांचं पक्क घर होत. पुढे एक खोली आणी मागे स्वयंपाकघर. पुढच्या खोलीत एकाच दिवा होता त्याचा मिणमिणता प्रकाश पसरला होता. घरात कपडे कोपर्यामध्ये ढीग करून ठेवले होते आणी त्याचाबाजुलाच २ लोखंडी ट्रंका एकावर एक ठेवलेल्या होत्या.

“ चाह घेणार न..” कमलाबाई ने आतून डोकावून विचारलं. तसं रॉबिनने होकारार्थी मान डोलावली.

काही वेळातच चहा घेऊन कमलाबाई रॉबिनच्या पुढे आली आणी पुढच्या लोखंडी कॉटवर विसावली. पदराने घाम पुसत आता रॉबिन काय विचारणार याचाच विचार करत चेहऱ्यावर दडपणाचे भाव घेऊन बसली होती. रॉबिनला ते कमलाबाईकडे न पाहताच समजलं होतं. त्यामुळे एकदम प्रश्नांची सरबत्ती न करता खेळीमेळीच्या वातावरणातूनच कमलाबाईची चौकशी करावी लागणार हे रॉबिनने ताडलं. तसंही समोरची व्यक्ती पाहून त्याचाकडून माहिती कशी काढून घ्यावी हे रॉबिनला चांगलंच समजत होतं. चहाचा एक घोट घेऊन आणी कमलाबाईकडे न पाहताच रॉबिन स्मितहास्य करत म्हणाला “ वाहः चहा फक्कड झालाय कमलाबाई “

यावर कमलाबाई कसनुस हसल्या.

“ तुमच्या हाताला चांगलीच चव आहे कमलाबाई” कमलाबाईकडे पाहत तृप्तीचे भाव आणत रॉबिन म्हणाला.

या स्तुतीने कमलाबाई नुसताच हा हा असं म्हणल्या पण त्यांचा मनावर आलेला ताण थोडा हलका झाला हे रॉबिनने टिपले आणी काहीही न बोलता चहा पिऊ लागला. काही वेळ असाच शांततेत गेला.

“ कमलाबाई वाड्यावर जे काही झालं ते खूप दुर्दैवी होतं. असं कोणाच्याही बाबतीत घडू नये. हा पण आता काय करणार आम्हाला कर्तव्यापोटी सगळ्यांचीच चौकशी करावी लागते. आमचं कामच आहे ते, त्याशिवाय आमचं पोट कस चालणार नाही का “ चेहऱ्यावर हसरे भाव आणत आणी शक्य तितके वातावरण खेळीमेळीचे ठेवत रॉबिन म्हणाला. कमलाबाई रॉबिनच्या या गोड बोलण्याने आता बर्यापैकी तणावरहित होऊ लागली होती आणी जरा  आरामात कॉटवर बसली होती.

“ कमलाबाई तुम्ही आम्हाला तपास कामात मदत करणार का? म्हणजे देसाई वाड्यावरचे लोक स्वभावाने कसे आहेत. तुमचाशी नीट वागतात का? पगारपाणी वेळेवर देतात का? वगेरे वगेरे माहिती हवी होती” चहाचा घोट घेत रॉबिन म्हणाला. आपला संशय हा तिच्यावर नसून तिला वाड्यावर कशी वागणूक मिळते हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत असं रॉबिन भासवत होता.

कमलाबाई सुद्धा आता जरा एक पाय वर घेऊन निवांत बसली आणी सांगू लागली – “मानस लय चांगली हायती बगा. माजी आन माज्या घरातल्या माणसांची खूप काळजी घेत्यात”

“ अस्स.. ते कस काय “रॉबिन उगाचच चहाचा कप हातात घेत प्रश्नार्थक मुद्रेने पाहू लागला.

“ मला पगार देत्यात येळेवर, माज्या पोरीची चौकशीबी करत्यात. माज्या मालकाला समजावून सांगत्यात सगळं” कमलाबाई बोलून गेल्या.

“ मालकाला काय समजून सांगत असतात” न समजून रॉबिन म्हनला. कमलाबाईच्या नवर्याला देसाई कुटुंबीय कशाबाबतीत समजावून सांगत असावेत याचा त्याला प्रश्न पडला.

तसं थोडासा खाली पाहत कमलाबाई म्हणाल्या “ आता काय सांगू साहेब तुम्हास्नी, आमचे मालक चांगल्या कंपनीत कामास्नी होते पण मित्राच्या नादाला लागून दारूच्या येसनाला लागले. आन त्या येसनापायी लयं भिकेकंगाल झाले होते. हातातली चांगली कंपनीतील नोकरी होती ती पण सोडून दिली. आन मलाबी घरात तरास देऊ लागले. म्या देसाई वाड्यावर काम करायचे तवा आणि अजून २-३ घरात धुनी भांडी बी करायचे. हि पोरगी शाळत शिकाय होती, तिच्या फी ला बी पैसा हातात गावत न्हवता. हे अविनास साहेबास्नी कळल तेव्हा तेनी हित येऊन आमच्या मालकाची समजूत घातली आणी मोठ्या बाईसाहेबांच्या ओळखीन एका ठिकाणी आमच्या मालकाला वाचमनची नौकरी देऊ केली.”

“ ओह्ह.. म्हणजे अविनाश यांनी मालतीबाई यांचा ओळखीने तुमच्या मालकांना नोकरी देऊ केली तर “रॉबिन चहाचा घोट घेत बोलला.

“ हा ते तर हायेच पन दर दिवाळीला आम्हा सगळ्यासनी कापड बी घेऊन दित्यात, वर बोनस बी. मला अविनास साहेबांनी फक्त आमच्या इथे कामाला या चांगला पगार देऊ असं सांगितलं. त्यांना वाडा सांभाळणारा कोणी बाईमाणूस पण पाहिजे हुतं. मोठ्या बाईसाहेबांकडे माणसांची लयं रीघ लागायची. आन वाहिनीसाहेबांना पण घरकामात मदतीला कोणीतरी हवंच होतं. आता ती मानस एवढं अमचासाठी करत्यात अजून काय पाईजे म्हनून मीबी हा म्हटलं.” कमलाबाईने एका दमात सगळं सांगून टाकलं.

एवढी माहिती कळताच आता मूळ मुद्द्याला हात घालायला हवा असं रॉबिनला वाटून गेल. हातातला चहा संपला असल्याची जाणीव त्याला झाली.

“ वाहः असा फक्कड चहा बऱ्याच दिवसात पिला बघा. अजून मिळेल का”? चेहऱ्यावर तेच समाधान मिळाल्याचे भाव आणत रॉबिन म्हणाला.

“ हाये कि अजून आनते हा.. असं म्हणत कमलाबाई उठली आणी पटकन स्वयंपाक घरात जाऊन तिने अजून एक चहाचा कप रॉबिनच्या हातात ठेवला.

“ आहाह.. कमलाबाई तुमचा हातचा चहा पिऊन अगदीच पोट भरल्यासारख वाटतय बघा” रॉबिन अतिशय मंदपणे स्मितहास्य करत चहाचा घुटका घेत म्हणाला.

“ आयो एवढा आवडला वय चाह तुम्हास्नी” कमलाबाई हलक्याच लाजत बोलल्या. त्या आता आरामात बसून बोलू लागल्या होत्या. याचाच फायदा घेत रॉबिनने पुढचा प्रश्न केला.

“ बऱ मला एक सांगा कमलाबाई, तुमच्या मोठ्या मालकीणबाई म्हणजेच मालतीबाई स्वभावाने कशा होत्या “रॉबिन मान खालुन चहा पीत उत्तराची वाट पाहू लागल्या. मालतीबाई विषयी बोलायचं म्हटल्यावर कमलाबाईचा चेहरा जरा सुकल्यासारखा झाला. तरीही त्या पुढे बोलू लागल्या – “मोठ्या बाईसाहेब स्वभावाला लयं कडक होत्या बगा. कामात जराबी कुचराई झालेली अजिबात खपत न्हवती त्यासनी. जरा सुदिक चूक झाली कि वसकन कावायचा. मला तर लय भीती वाटायची बगा त्यांची.

“ अच्छा घरातल्या सगळ्यांशीच तसं वागायचा कि फक्त तुमचाबरोबरच” रॉबिन हलकं हसत म्हनला.

“ सगळ्यानशीच ओ..कोणाला सुदिक सोडत नसायचा.. आबासाहेब बरे होते तेव्हा ते सांभाळून घ्यायचे समद, पर आबासाहेबांचा डोक्याचा अपघात झाल्यापासन ते खाटेवर पडून होते मगतर बाईसाहेबांना कोणीबी आवरणार न्हवत.” मान खाली घालत कमलाबाई बोलली.

“ आणी त्यांची दोन्ही मुलं आणी सून त्यांचाशी सुद्धा असंच कडकपणे वागणं होतं का? “ प्रश्नार्थक मुद्रा करत चहाचा कप धरून रॉबिन म्हणाला.

“ अर्रर..ते तर इचारुच नका तुम्ही ...” कपाळावर हात ठेवत कमलाबाई म्हणाली. तसा रॉबिन जरा खुर्चीत नीट बसला आणी म्हणाला”

का हो काय झाला एवढ कपाळावर हात मारण्यासारख? रॉबिनच्या या प्रश्नासरशी कमलाबाई सुद्धा सावरून बसत थोडं पुढे झुकत बोलू लागली.

“ अवो अविनास साहेबास्नी आन वाहिनीसाहेबास्नी तर लयच कावायच्या. कुटबी चूक झाली तर लय झापायचा दोघांना. आन बिचारी दोघबी निमुटपनी ऐकायचे सगळं. आबासाहेबांना सांभाळायला दवाखान्यातून नर्स ठिवली होती तर तिलाबी काडून टाकली आन या दोघास्नीच आबासाहेबांच सगळं बागाय लावलं” कमलाबाई दुखी स्वरात म्हणाल्या.

“ आणि त्यांचा दुसरा मुलगा आशुतोष त्याला काही बोलायचा कि नाही” रॉबिनने विचारलं

“ हम्म.. असं म्हणत आणी ओठ मुडपत नाराजीचा स्वर काढत कमलाबाई म्हणाली.. तर तर तेला कशाला काही बोलतील बाबा. लाडाचा गोळा न तेंचा तो. आपल्या पोटच्या पोराला कशाला काय बोलतील त्या”

“ आपल्या पोटच्या पोराला म्हणजे...न समजून रॉबिनने विचारलं “

“ अवो आशुतोष तेंचा स्वतःचा पोरगा ना..अविनास साहेब हे आबासाहेबांच्या पहिल्या बायकोचे पोर होते. सावत्र मुलगा मोठ्या बाईसाहेबांचा.” कमलाबाईने एका दमात सांगून टाकलं.

“ काय सांगताय काय.. “ हातातला चहाचा कप तसाच ठेवून कमलाबाई यांचाकडे आश्चर्याने पाहत रॉबिन बोलला.

“ हो आबासाहेबांची दोन लग्न झाली हायेत. पहिली बायकू आजारात मेली तिचा पोरगा म्हणजे अविनास साहेब. ते लहान असतानाच तेंची आई गेली. मग लहान पोराची खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये म्हनून आबांनी दुसरं लगीन केलं ते मोठ्या बाईसाहेबासंग, तेंना जो पोरगा झाला त्यो आशुतोस” कमलाबाई ने माहिती पुरवली. रॉबिनला हि माहिती नवीन असल्याने तो विचारात पडला कि इ. देशमुखांनी त्याला हि माहिती कशी काय सांगितली नाही कि त्यांनाच या बाबत काही माहिती नाहीये. खुनाच्या प्रकरणात सर्व प्रकारची सर्व अंगाने माहिती घेणे गरजेचे असताना देशमुखांन हि माहिती कशी नसावी. रॉबिनला भराभर प्रश्न पडत गेले. कदाचित पोलिसांच्या चौकशीत पोलिसांनी या अनुषंगाने चौकशी केली नसावी आणी वाड्यावर सगळ्यांची चौकशी होत असताना हि माहिती देण्यासारखं महत्व वाड्यावरील कोणत्याच सदस्याला देखील कोणाला वाटलं नसेल. असो आता आपल्याला हि माहिती मिळाली हे महत्वाचं आहे. एकंदरीत कमलाबाईला घरी भेटण्याचा निर्णय आपल्याला चांगलाच फळला.

“ चाह देऊ का अजून साहेब” रॉबिनची विचारांची तंद्री भंग करत कमलाबाईने विचारलं

“ न..नाही नको एवढा पुरे आहे... एवढं बोलून रॉबिनने आता थोडसं गंभीरपणे प्रश्न विचारायला सुरुवात केली-

“ अविनाश सोबत मालतीताई यांचं वागण कस असायचं” रॉबिन ने विचारलं.

“ अवो काय सांगू लयच हाड्तुड करत वागणूक द्यायचा तेस्नी तर, आन वहिनिसाहेबास्नी पण अशीच वागणूक देयाचे. बिचारी दोग मात्र शांतपणे त्यांची सगळी कामा निमुटपणे करायची. कवा कवा वहिनिसाहेबास्नी अविनास साहेब इचारायला पण येयाचे कि काही मदत करू का कामात म्हणून, पण वहिनीसाहेब नाई नाको म्हणून सगळी कामा एकटी करायचा. तरीबी येळ मिळेल तसं अविनास साहेब घरकामात वाहिनिसाहेबांना मदत करू लागायचे. दोघांचा एकमेकांवर लाय जीव बगा. कवा कवा मला वाटायचं माझीच दृष्ट नको लागाय या जोडप्याला.” कमलाबाई हलकेच हसत वर पाहत म्हणाल्या.

“ कमलाबाई त्या दिवशी जेव्हा मालतीबाई जमिनीवर कोसळल्या तेव्हा नक्की काय झालं होतं मला सविस्तर सांगाल का? रॉबिन गंभीर चेहरा करत म्हणाला.

“ हो सांगती कि असं म्हणत कमलाबाईनी पदर कमरेला खोचला दोन्ही पाय खाटेवर घेतले आणी सांगायला सुरुवात केली- “ त्या दिशी बगा वाड्यावर मला खूप कामा होती. सकाळपासून मी आणि वहिनीसाहेब कामातच हुतो, सगळी जुनी भांडी काढून धुवून पुसून ठिवली, समदा वाडा झाडून पुसून साफ केला. संध्याकाळी झाल्यावर मी आन वहिनीसाहेब गप्पा मारत स्वयंपाकघरात भाज्या निवडत बसलो हुतो, अचानक मोठ्या बाईसाहेब तनतनत स्वयंपाकघरात आल्य. आन मोठ्या बाईसाहेबांनी ४-५ साड्या आन २-३ चादरी आमच्या समोर आणून टाकल्या. आन म्हणाल्या हि कापड का धुतली न्हाईत. अमी दोगी त्यांचा तोंडाकड बघतच राहिलो, घटकाभराने वहिनिसाहेबांनी सांगितलं कि मागच्याच हप्त्यात धुतली हायती हि. तवा बाईसाहेब म्हणाल्या या साड्या खराब झाल्यात, चादरींवर कळकट डाग पडलेत परत आताच्या आत्ता धुवा हि कापड, मला अंघोळीला जायचंय. असं म्हणून त्या अंघोळीला निघून गेल्या आम्ही दोगी आदीच दिवसभराच्या कामाने थकून गेलू होतु. परत हे कपडे धुवाचे म्हटल्यावर मला तर लय आंग मोडून आल्यावानी झालं. पर बोलणार काई, माझी तर घरी जायची येळ झाली हुती कारण पोरगी घरी एकटी असते सांच्याला. कारण माझं मालक रात्रपाळीला जातो. मला लगबग घरी याचं हुतं. वहिनीसाहेबांस्नी हे माहित हुत म्हनून त्या म्हणाल्या “कमलाबाई तुमी जावा मी समदी कापड धुते. वाहिनीसाहेबांना एकट्याला एवढ कपडं धुवायला लावायला लावून घरी जायचं, मला लय वंगाळ वाटलं बगा. बिचाऱ्या वाहिनीसा मोठ्या बाईसाहेबांचा शब्द कधी खाली पडू दिला नाही तेनी. त्यांना असं एकट्याला कामा कराया सोडून जावा वाटना. तवा मी पन थांबले आन म्हनले मी पन थांबते दोगीबी मिळून कापड धु. आन आम्ही दोगी वाड्याच्या मागच्या बाजूला हिरीवर कापड घेऊन गेलू. वहिनिसाहेबांनी रहाटाला कळशी लावली आन पानी उपसून काडाय लागल्या. मंग मी आन वहिनीसाहेब कपडे धुवाय लागलो. काही वेळात पानी संपल आन वहिनिसाहेबांनी परत पानी उपसायला कळशी हिरीत टाकली आन पानी उपसणार एवढ्यात दोर तुटला आन कळशी हिरीतच पडली. आत सांच्याला हिरीत उतरून कळशी काढायची म्हटल्यावर आम्हा दोघींना जमणार न्हवत. मंग मीच म्हणाले वहिनीसाहेब आता कळशी राहूदेत आतमध्येच हिरीतच साहेबास्नी सांगून परत काढू. तुमी कापड धुवा तवर म्या आत जाऊन दुसरी कळशी आणते. असं म्हणून मी मागच्या रस्त्याने आतमध्ये परत वाड्यात आले. आन जिन्याने वरच्या मजल्यावर गेले कारण वरल्या मजल्यावर सामानाच्या खुलीत जुन्या सामानांच्या पसाऱ्यात  लय समान हुत, तीत कळश्या, बादल्या आन लय कायकाय सामान असतया. तीत इकडतिकड पाहिल्याव मला कोपऱ्यात एक कळशी दिसली ती घेतली आन खाली आली. तवा खाली येताना म्या पाहिलं कि मोठ्या बाईसाहेबांच्या खोलीचा दरवाजा उघडाच हुता त्या अंघोळ करून खोलीत आल्यावर खोली अशी उघडी ठेवत नसायच्या. म्हणून म्हन्ल आत बगाव आन माझी नजर आतमध्ये गेली. तवा मला लांबून दिसलं कि मोठ्या बाईसाहेबांचे पाय जमिनीवर पालथ दिसल. जणू की उताण्या पडल्यात तसं म्या म्हटलं अशा का पडल्याती जरा जवळून जाऊन बगाव असं म्हनून खोलीच्या समोर आले. तर मोठ्या बाईसाहेब जमिनीवर उताण्या पडलेल्या दिसल्या मी तर घाबरलेच पाहिलं वाटलं चक्कर बिक्कर येऊन पडल्या कि काय म्हणून हाका मारल्या. तर हु नाही कि चू नाही माजी काय त्यस्नी हात लावायची हिम्मत झाली. आवाज देऊन बी त्या उठानात आन कसली हालचाल बी करानात मंग मात्र मी घाबरले. पळत वाड्याच्या मागी गेले, आन मी मोठ्याने वाहिनिसाहेबास्नी हाका मारल्या तवा त्या घाबरून पळत आल्या. त्यांनीबि हाक मारल्या, जवळ जाऊन हलवलं तरीबी उठानात. शेजारच्या खोलीत आबा खाटेवर आजारी असल्यागत पडलेलं असायचं तवा त्यांना उठवून बी काय फायदा न्हवता कारण आबांना सौताचीच सूद नसायची. मंग मीच वाड्याच्या बाहेर गेले आन बाहेर जाऊन २ लोक बोलावून आणली आन त्यांनी डाक्तरास्नी बोलावून आनल. डाक्टारने तपासून सांगितलं कि हास्पिटलात हलवा. एवढ बोलून कमलाबाई शांत बसली

रॉबिन शांतपणे हाताची बोटे एकमेकात गुंफवून शांतपणे ऐकत होता. कमलाबाईच्या घराबाहेर आता रात्र पडली होती आणी आजूबाजूला शांतता पसरली होती. घरात कोणी काहीच बोलत न्हवत. कमलाबाईची पोरगी सुदा आमच्याकडे आम्ही काय बोलत आहोत ते ऐकत शांतपणे पाहत बसलेली होती. रॉबिन खुर्चीत जरा मागे टेकून बसला आणी म्हनला. “ कामालाबाई तुम्ही जेव्हा कळशी आणायला परत आत वाड्यात गेला तेव्हा वाड्यात बाहेरून कोणी आल्याचा तुम्हाला जाणवलं का? किंवा बाहेरून कोणी आतमध्ये येऊन मालतीबाई यांची हत्या केली असेल असं तुम्हाला वाटत का? रॉबिन शांतपणे कमलाबाईकडे पाहत म्हणाला. त्यावर कमलाबाई विचार करत म्हणाल्या

“ नाई वो असं नाई वाटत मला. कारण अमी धून धुवाय गेलो तवा कोनी न्हवत वाड्यात, तसंबी वाड्याच पुढच दार दिवसभर उघडंच असतंय रातच्याला अविनास साहेब आले कि लावून टाकायचे. हा आता अचानक कोन बाहेरून आलं आसन तर आम्ही मागे धून धूत असल्यामुळे आलो असेल तर मला माहित नाई” कमलाबाई ने चेहरा बारीक करत सांगितलं.

“ हम्म..डॉक्टर पाटील हे कसे होते स्वभावाने “ रॉबिनने हनुवटीवर हात ठेवत विचारले.

“ त्यो तर लय डोमकावळ्यावाणी होता बगा... नजर चांगली न्हवती मेल्याची” तोंड वाकड करत कमलाबाई म्हणाल्या.

“ अच्छा ... अजून काही विशेष त्यांचाबद्दल म्हणजे कामाव्यतिरिक्त कधी येणं जाणं त्याचं वाड्यावर “ रॉबिनने विचारलं.

“ आबास्नी बगायला येयाचा तेवढच..पन आला कि आपलं इकडे बघ तिकडे बघ करायचा लुथभरयासारखं... हलकट मेला “ दात विचकत कमलाबाई म्हणाला.

“ हम्म... “ असा उद्गार काढून रॉबिन शांत बसला. आता अजून जास्त काही विचारण्यात काही अर्थ न्हवता कारण महत्वाच्या गोष्टी त्याला समजल्या होत्या. कमलाबाईनी बरीच माहिती दिली होती. आता इथे जास्त वेळ बसण्यात काही अर्थ न्हवता.

त्यामुळे रॉबिन खुर्चीतून उठला आणि म्हणाला “ चला कमलाबाई निघतो मी आता खूप वेळ घेतला तुमचा. मस्त चहा पाजलात तुम्ही, आणी तुमची खूप मदत झाली मला.”

कमलाबाईने सुद्धा हसत हसत रॉबिनला निरोप दिला. कमलाबाईच्या घरातून बाहेर पडल्यावर रस्त्यावरून रॉबिन खूप शांतपणे चालत चालला होता. रस्त्यावर जास्त वर्दळ न्हवती. बहुतेक घरात निजानीज करण्याची तयारी चालू होती. आज त्याला बरीच महत्वाची माहिती मिळाली होती. आणी तपासकार्यात त्याची खूप मदत होणार होती त्यानुसारच तपासाची पुढची दिशा ठरणार होती. रॉबिनची विचारचक्र वेगाने फिरत होती. कमलाबाई हिने दिलेल्या माहितीनुसार वाड्यात कोणाच्याही अपरोक्ष वाड्यात येऊन घातपाताच कृत्य करता येऊ शकत होत असंच दिसतं होतं पण नक्की कोण असं करू शकेल? आणी केलंच तर त्याने कोणत्या हत्याराच्या सहाय्याने हे कृत्य घडवून आणलं? मालतीबाई यांना अशा विचित्र पद्धतीने मृत्यू देण्यामागे गुन्हेगाराचा काय हेतू असू शकत होता? असे एक न अनेक प्रश्न रॉबिनच्या मनात पिंगा घालत होते. जोपर्यंत गुन्ह्यात वापरलेलं हत्यार आणी गुन्हा करण्यामागचा हेतू कळणार नाही तोपर्यंत हे कोडं उलगडणार नाही हे रॉबिन जाणून होता. त्यामुळे लवकरात लवकर पाऊले उचलण्याची गरज होती. तसही गुन्हेगार जो कोणी असेल तो आत्तापर्यंत सावध झालेला असू शकतो. त्यामुळे अतिशय सावधपणे पाऊले टाकणं क्रमप्राप्त होतं. त्यामुळे उद्या काय काय कामं केली पाहिजे याचा एक विशेष आराखडा रॉबिनच्या मनात तयार होऊ लागला होता.


क्रमशः


गुप्तहेर रॉबिन आणी कुटीरोवांचं शस्त्र - भाग ३

 काही वेळातच पोलिसांच्या गाडीमधून रॉबिन देसाई वाड्याच्या जवळ पोहोचला. देसाई वाडा तसा प्रशस्त आणी आकाराने सुद्धा मोठा वाटत होता, वाडा दुमजली होता. मोठ्या दगडाचं बांधकाम जुन्या काळातील होतं. मात्र वाडा अजूनही भक्कम असल्याप्रमाणे उभा होता. आजूबाजूला काही अंतरावर देसाई वाड्यासारखेच काही प्रशस्त वाडे होते. तिथे काही म्हातारी जोडपी राहायची त्यांची मुले इतर ठिकाणी कामाला असल्याने ती दांपत्य इथे एकटेच राहत असत अशी माहिती देशमुखांनी पुरवली. वाड्याच्या मुख्य दरवाजाजवळ एक पाटी होती “ देसाई वाडा “ अशा नावाची. गाडीतून उतरून रॉबिन त्या पाटीजवळ उभा राहून तिला न्याहाळू लागला. मागून इ. देशमुख आणी म्हस्के हवालदार त्याचा जवळ येऊन उभे राहिले आणी रॉबिन नक्की काय पाहतोय हे बघू लागले.

“ खूपच जुना आहे वाटत हा वाडा “ दारावरील पाटीकडे पाहतच रॉबिन म्हणाला.

“ हो खूप जुना आहे, खरंतर मालतीताई यांचा पूर्वजांचा हा वाडा त्यांचा वडिलांच्या पश्चात मालतीताई यांना मिळाला. मग त्या आपल्या नवर्यासोबत इथेच राहत होत्या” देशमुखांनी माहिती पुरवली.

“ चला आत जाऊ “रॉबिन अचानक मुख्य दरवाजाकडे वळला.

रॉबिन आणी देशमुख आतमध्ये आले. देशमुखांनी हवालदार म्हस्के यांना मुख्य दारातच उभे राहायला सांगिलते जेणे करून इतर चौकशीदरम्यान इतर कोणाचा त्रास नको. रॉबिन आणी देशमुख वाड्यात प्रविष्ट झाले. वाड्यात आल्यावर रॉबिन चौफेर पाहू लागला. मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यावर काही पावलांवर तुळशीवृंदावन होतं, तिथे लावलेल्या अगरबत्ती चा सुवास वातावरणात दरवळत होता. तुळशीच्या आसपास मध्ये मोठी मोकळी जागा आणी आजूबाजूला काही खोल्या, वाडा दुमजली असून वरच्या मजल्यावर सुद्धा काही खोल्या होत्या. रॉबिन शांतपणे वाड्याच्या आतला भाग निरखत होता. रॉबिन आणी देशमुख इथे आल्याची कुणकुण बहुतेक आतल्या लोकांना लागलेली नसल्यामुळे बाहेर कोणीच आलेले न्हवते. इ. देशमुखांनी पुढे जाऊन मोठ्याने हाका मारल्या.

“अविनाश, आहेस का घरात ... “ देशमुख इकडे तिकडे पाहू लागले.

तेवढ्यात बाजूच्या खोलीमधून अविनाश नावाचा एक इसम बाहेर आला. तो दिसायला उंचपुरा साधारण पस्तिशीचा आणी शांत चेहऱ्याचा असा होता.

“ अरे इन्स्पेक्टर साहेब तुम्ही ... काहीशा प्रश्नार्थक मुद्रेत अविनाशने देशमुखांना विचारलं.

“ हो, मी टेलिफोन वरून सांगितलं होतं ना कि गुप्तहेर रॉबिनसुद्धा या तपासात सामील होतायत ते हेच.” देशमुखांनी रॉबिन कडे निर्देश करत म्हटलं.

तशी अविनाशची नजर रॉबिनकडे गेली.

रॉबिनने हात जोडून नमस्कार केला. अविनाशने सुद्धा हसून नमस्कार केला.

“ आणी रॉबिन हे अविनाश देसाई. मालती देसाई यांचे ज्येष्ठ सुपुत्र. देशमुख यांनी रॉबिनची ओळख करून दिली. आणि ते पुढे अविनाश कडे पाहत बोलू लागले.

“आमच्या खात्यातील वरिष्ठ लोकांनीच रॉबिनला प्रकरणात लक्ष घालायला सांगितलं आहे, तर घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी करावी म्हणून ते आलेत. तर तुमची हरकत नसेल तर......” एवढ बोलून देशमुख अविनाश च्या प्रतिक्रियेची वाट पाहू लागले.

“ अहो त्यात हरकत कसली, ते तुमची मदत करणार असतील तर माझी काय हरकत असणार” अविनाश हसून देशमुखांना बोलला.

“ बऱ, तुम्ही या बाजूच्या खोलीत बसा मी पाणी घेऊन लगेचच येतो “ एवढ बोलून अविनाश स्वयंपाक घराकडे वळणार इतक्यात रॉबिनने अविनाशला अडवले आणी म्हणाला” तुम्ही जर कुठे बाहेर जाण्याचा तयारीत असाल तर जाऊ शकता पण तत्पूर्वी तुम्हाला काही प्रश्न विचारेन नंतर तुम्ही जाऊ शकता.”

रॉबिनच्या या वाक्यावर अविनाशने देशमुखांकडे आश्चर्याने पहिले आणी म्हणाला” हो मी नेहमीप्रमाणे आबांना म्हणजे माझ्या वडिलांना बाहेरून फिरवून आणायला निघालेलो होतो पण काही हरकत नाही मी थोडावेळ थांबेन तुमचा प्रश्नांची उत्तरं देईन आणी मग आबांना घेऊन जाईन.”

“ ठीक आहे “ एवढ बोलून रॉबिन शांतपणे आजूबाजूला पाहू लागला. अविनाश पाणी आणायला स्वयंपाक घरात वळला

देशमुख आणी रॉबिन अविनाशने सांगितलेल्या खोलीत बसले. ती खोली देसाई कुटुंबीय मिटिंग रूम म्हणून वापरायचे. खोलीत आजूबाजूला २-३ खुर्च्या, एक सोफा, छोटा टेबल आणी त्यामागे एक मोठी खुर्ची. कदाचित मालती बाई यांचा ओळखीतील राजकारणी लोकं त्यांना काही कामानिमित्त भेटायला आल्यावर इथेच बसवत असतील.

“ अविनाश बाहेर कुठेतरी निघालाय हे तू कस ओळखलंस “ देशमुखांनी रॉबिनला विचारलं.

“तुम्ही त्याला मगाशी हाक मारली तेव्हा तो ज्या खोलीतून बाहेर आला त्याच्या दरवाजाबाहेर त्याचे स्पोर्ट्स शूज होते आणी बाजूलाच मोजे पडलेले होते जसे काही कोणीतरी ते पायात घालायला बाहेर काढतो तसे. आणी अविनाश ने जो फुल शर्ट घातला होता गडबडीत त्याने त्याचा शर्ट च्या बाहीची बटने लावलेली न्हवती. त्यावरून एक तर्क काढला बस” रॉबिन ने सांगितलं.

देशमुख पुढे काही बोलणार इतक्यात अविनाश पाणी घेऊन आत आला. रॉबिन आणी देशमुखांनी पाणी घेतल. अविनाश बाजूच्याच खुर्चीत बसला.

“ मिस्टर अविनाश मला खरतर खूप खेद आहे जे तुमचा आईंच्या बाबतीत घडलं त्याचा, पण घडलेल्या गोष्टींची उकल व्हावी एवढाच माझा हेतू आहे आणी त्यासंदर्भातच मी तुम्हाला आणी घरातील इतर सदस्यांना काही प्रश्न विचारू इच्छितो अर्थात तुमच्या परवानगीने’’ रॉबिन पाणी पिऊन झाल्यावर पाण्याचा ग्लास बाजूला ठेवत म्हणाला.

“ माझी काहीही हरकत नाहीये रॉबिन. तुम्ही फक्त तुमचं काम करताय याची कल्पना आहे मला. आमच्याबाजूने आम्ही तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करू ? अविनाशने अगदी शांतपणे रॉबिनकडे पाहत त्याला सांगितल.  रॉबिनला त्याचा नजरेत एकप्रकारचा ठामपणा दिसला. आईच्या निधनानंतर सुद्धा तो खचून न जाता घरचा भार खंबीरपणे सांभाळत असल्याचे पाहून रॉबिनला त्याचे कौतुक वाटले.

“ अविनाश तुम्ही काय काम करता” रॉबिनने अविनाशला विचारलं.

“ माझी शहराबाहेर बागायती रोपे विकायची नर्सरी आहे” अविनाश म्हणाला

“ अच्छा..अविनाश खरतर तुमचा आईंच्या बाबतीत जी दुर्दैवी घटना झाली त्यानंतर चौकशीत तुम्ही पोलिसांना अगोदरच तुमचा कौटुंबिक तपशील आणी घटनेसंदर्भात सांगितल असेल पण मला तो तपशील तुमच्याकडून ऐकायचा आहे तेव्हा मला सांगा कि तुमचा घरात वा वाड्यात कोण कोण राहत? एवढ बोलून हाताची बोट एकमेकांमध्ये गुंतवून रॉबिन अविनाश च्या उत्तराची वाट पाहू लागला.

रॉबिनच्या प्रश्नानंतर अविनाश खुर्चीत सरळ बसला. आणी म्हणाला ” या वाड्यात माझे बाबा, मी माझी बायको नंदिनी आणी माझा धाकटा भाऊ आशुतोष राहतो.

“ घटना झाली तेव्हा तुम्ही कुठे होतात “रॉबिन पुढचा प्रश्न केलात.

“ घटना घडली तेव्हा मी डॉक्टर पटवर्धन यांचा हॉस्पिटल मध्ये होतो, माझा वडिलांचे उपचार तिथे चालू आहेत त्यासंदर्भातच त्यांना भेटायला गेलो होतो” अविनाश उत्तरला.

अविनाश बोलत असताना रॉबिन ने आपल्या जाकीटच्या आतल्या कप्प्यातून एक छोटी डायरी आणी पेन बाहेर काढले. आणी अविनाशशी बोलतच त्यामध्ये काहीतरी लिहू लागला.

“ अच्छा. काय झालंय तुमचा वडिलांना“ रॉबिनने डोळे बारीक करत डायरीमधून नजर न काढताच विचारले.

“ त्यांना स्मृतीभ्रन्शाचा आजार आहे, मागच्या वर्षी ते एके ठिकाणी त्यांचा मित्रासमवेत फिरायला गेले असताना तिथे त्यांचा एक छोटासा अपघात झाला त्या अपघातात डोक्याला मार लागला. तिथून आल्यावर त्यांना जास्त काहीच आठवेना. आणी ते जास्त बोलत देखील न्हवते. आणी नंतर तर आम्हा घरातल्या लोकांना सुद्धा ओळखेनासे झाले. म्हणूनच मग मागच्या काही महिन्यांपासून त्यांचे शहरातील डॉक्टर पटवर्धन यांचाकडे उपचार चालू आहेत.” अविनाश हे सांगत असताना रॉबिन आपल्या डायरीमध्ये पटापट काही नोंदी घेत होता.

“ बर मग घटना घडली तेव्हा वडील कुठे होते, आणी घरात कोण कोण होते “रॉबिनने विचारलं.

“ घरात आबा हे त्यांचा खोलीत आराम करत होते, आणी माझी बायको आणी आमची कामवाली बाई कमला वाड्याचा मागच्या बाजूला विहिरीतून पाणी काढत होत्या, आमची कामवाली बाई कमला काही तरी आणायला म्हणून मागच्या बाजूने आत वाड्यात मध्ये आली तेव्हा आईच्या खोलीसमोरून जाताना तिला दिसलं कि आई जमिनीवर पडली होती, कमला ला वाटलं कि आई बेशुद्ध वगेरे पडली कि काय म्हणून तिने आईला हाका मारल्या. पण तरीही ती काही हालचाल करेना. मग तिनेच आरडाओरड करून सगळ्यांना गोळा केलं.” अविनाश म्हणाला.

“ ओह्ह म्हणजे मालतीताई यांना जमिनीवर पडलेलं तुमची कामवाली बाई कमला हिने आधी पाहिलं तर ..बर तुमचे वडील म्हणजेच आबा कुठे होते तेव्हा..” रॉबिनने ओठ मुडपत विचारलं. बाजूलाच बसलेले इ. देशमुख लक्षपूर्वक दोघांची प्रश्नोत्तरे ऐकत होते.

“ आबा त्यांचा खोलीतच होते, त्यांना काही ऐकू आलं असेलं असं वाटत नाही. तसंही ते बाहेर आलेच नाही कारण त्यांना चटकन हलता येत नाही. आणी त्यांचा खोलीला आम्ही बाहेरून कडी लावत असतो कारण आमच्या अपरोक्ष ते चुकून वाड्याचा बाहेर जाऊ नये म्हणून.” अविनाश ने माहिती दिली.

“ ह्म्म्म तर एकंदरीत अशी घटना घडली. मग त्यानंतर तुम्ही हॉस्पिटल मधून माघारी आलात. मग तुमचा जवळच राहणाऱ्या पाटील डॉक्टरांना कोणी बोलावलं “रॉबिन ने हातातील छोटं पेन हनुवटीला टेकवत विचारलं.

“ कमला चा आरडाओरडा ऐकून शेजारचे काही लोक बाहेर जमा झाले होते, त्या गर्दीमधीलच कोणीतरी डॉक्टरांना झालेल्या घटनेची खबर दिली आणी ती मिळताच ते तडक आले होते. तसे ते आमचे फ्यामिली डॉक्टर पण आहेत आणी आमचे त्यांचे घरगुती संबंध पण आहेत. त्यांनीच आमचा आईला तपासलं. आईची नाडी लागत न्हवती म्हणून त्यांनी हॉस्पिटल मध्ये हलवायला सांगितलं. आणी पोलिसांना पण फोन करून सांगितलं त्यानंतर मी घरी आल्यावर डॉक्टर पाटलांनी मला हि माहिती दिली” अविनाश ने सांगितलं.

“ मालतीताई यांचा कोणी घातपात केलाय असा संशय कोणाला आला होता का? म्हणजे त्या अचानक अशा त्यांचा खोलीत कशा काय पडल्या. कोणती शारीरिक व्याधि होती का मालतीताईना? “रॉबिन ने प्रश्न केला.

“ नाही हो कोणती व्याधि अशी न्हवती, अगदी ठणठनित होती तिची प्रकृती. म्हणूनच तर आम्हाला कळेना कि ती अचानक अशी कशी काय जमिनीवर पडली. घातपात झाल्यासारखं काही वाटत न्हवत. प्रथम आम्हाला संशय आला काय हुदयविकाराचा झटका वगेरे आला कि काय. पण हॉस्पिटल मध्ये आईला नेल्यानंतर त्यांनी आईचा मृत्यू झाल्याचं सांगितल आणी असं पण सांगितलं कि मृत्यूचं कारण स्पष्ट होत नाहीये तर पोस्टमार्टेम करावं लागेल.” अविनाशला हे सगळं सांगताना खरंतर भरून आलं होतं.

रॉबिनने त्याचे प्रश्न थोडेसे थांबवले आणी देशमुखांकडे सूचक नजरेने पहिले तसं इ. देशमुखांनी अविनाश च्या खांद्याला स्पर्श करत बाजूचा पाण्याचा भरलेला ग्लास अविनाशला देऊ केला. अविनाशने देशमुखांच्या हातातून पाण्याचा ग्लास घेतला आणी तो पाणी पिऊ लागला. तोपर्यंत रॉबिनने आपल्या छोट्या डायरीमध्ये लिहिलेल्या नोंदी परत न्याहाळल्या. अविनाश पाणी पिऊन जरासा स्थिर झाल्यावर रॉबिन ने विचारलं “ अविनाश तुम्हाला शेवटचा एकंच प्रश्न विचारतो, मालतीताई यांचा कोणी शत्रू होता काय ज्याने त्यांचा असा घातपात घडवून आणला. साहजिकच कोणाला मागमूस न लागता तो वाड्यात शिरला आणी आपलं काम उरकून निघून गेला असेल?

रॉबिनच्या या प्रश्नाने अविनाश विचारात पडला. त्याचा कपाळावर किंचित आठ्यांच जाळ आला आणी त्याची नजर जमिनीकडे वळली. रॉबिन अविनाश कडेच निरखून पाहत होता त्याचाही नजरेतून अविनाश चे हे बदल सुटले नाहीत.

“ नाही तसं शत्रू वगेरे कोणी असेल असं मला वाटत नाही. राजकारणातील काही व्यक्तीशी तिचे राजकीय मतभेद जरूर होते. पण ज्यावेळी ती राजकारणात सक्रीय होती तेव्हाची गोष्ट, सध्या आई राजकारणात तितकी सक्रीय नसायची तेव्हा मला काही निश्चित सांगता येणार नाही. अविनाश जे जरा अवघडूनच उत्तर दिल. मुळात त्याला रॉबिन चा प्रश्न तितकासा रुचला न्हवता. रॉबिनने देखील हे ओळखून त्यावर जास्त काही विचारलं नाही.

“ ठीक आहे अविनाश आम्हाला तुमचा आईची खोली दाखवा जिथे हा सगळा प्रकार घडला आणी त्यानंतर मी तुमचा कुटुंबातील इतर सदस्यांची ओळख करून घेतो” आपल्या जागेवरून उठत रॉबिन म्हणाला.

“ हो हो चला “ असं म्हणून अविनाश उठून खोलीच्या बाहेर पडला मागोमाग रॉबिन आणी देशमुख चालू लागले.

खोलीबाहेर पडताच त्या वाड्याचा दुसर्या टोकाला एक खोली होती अविनाश तिकडे जाऊ लागला.

वाडा आतून दिसायला  “C”  या इंग्रजी अक्षराप्रमाणे होता वाड्याच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला पहिली खोली जिथून आत्ताच रॉबिन आणी देशमुख निघाले होते. तिथून पुढच्या दोन खोल्या या घरगुती सामानानी आणी भरलेल्या होत्या. पुढे वर जाण्यासाठी जिना आणी त्याचाच बाजूला थोडा व्हरांडा जेथून वाड्याचा मागच्या बाजूला सुद्धा जाता येत होतं. मुख्य दरवाजापासून डाव्या बाजूला प्रथम स्वयंपाकघर, नंतरची खोली अविनाश चे वडील आबा यांची आणी नंतर तिसरी खोली मालतीताई यांची वेगळी खोली होती. त्याचा बाजूलाच जरा आतमध्ये न्हाणीघर होतं. अविनाश रॉबिन आणी देशमुख यांना घेऊन मालतीताई च्या खोलीबाहेर आला. आणी खोलीचं दार उघडून दिलं. आणी रॉबिन आणी देशमुख यांनी आतमध्ये प्रवेश केला.

मालतीताई यांची खोली जराच मोठी होती साधारण दोन माणसांना पुरेल एवढी होती. खोलीत प्रवेश केल्याकेल्या डाव्या एका बाजूला बेड, मोठं कपाट, पुढच्या भिंतीवर एक मोठा आरसा आणी त्याचा बाजूला बंद खिडकी. तिच्या अगदी बाजूला एक टेबल ज्यावर एक रात्री कामाला येईल असा दिवा आणी काही लिखापडीची साहित्य पडलेली होती. जमिनीवर जिथे मालतीताई गतप्राण झालेल्या होत्या त्या जागी पोलिसांनी पांढऱ्या रंगाने रेखांकन केलं होतं ज्याने करून बॉडी जमिनीवर कशी पडलेली होती हे समजायला मदत होत होती. रॉबिन ने आतमध्ये सगळ्या गोष्टी बारकाईने पाहायला सुरुवात केली. भिंतींना रंग नवीन पद्धतीने दिलेला असला तरी खिडकी आणी दरवाजाची लाडकी कलाकुसरीची कामे जुन्या पद्धतीची होती. रॉबिन ने खिडकी जी बंद होती तिची खुंटी काढली आणी उघडली. खिडकीला गज न्हवते ती पूर्ण उघडी झाली. रॉबिनने बाहेर पाहिलं तर बाहेर ऊन उतरून बर्यापैकी संध्याकाळ झालेली होता. मालतीताई यांचा या खोलीबाहेरून वाड्याचा बाहेरचा डावा भाग दिसत होता. थोडीशी जागा सोडली कि पुढे पुरुषभर उंचीचं वाड्याच दगडी कम्पौंड होतं. त्यांचा शेजारी कोणी राहत न्हवत पण थोडी जागा सोडून पलीकडे जरा लांब देसाई यांचा वाड्यासारखाच एक वाडा होता, जिथे एक वृद्ध दाम्पत्य राहायचे अशी माहिती देशमुखांनी मगाशी दिलेली होती. रॉबिन ने बाहेरच सगळं निरीक्षण करून खिडकी परत लावली. आणी खिडकीच्या शेजारच्या भिंतीवरील लावलेल्या आरशाकडे पाहू लागला आरसा चांगलाच मोठा होता. तिथून त्याने खिडकीकडे कटाक्ष टाकला तर ते अंतर जास्त न्हवत. काहीसा विचार करत त्याने खाली वाकून इकडे तिकडे पाहिलं. परत उठला आणी दरवाजाकडे पाहिलं. देशमुख आणी अविनाश फक्त त्याचा हालचाली पाहत उभे होते. रॉबिनने खिशातून परत आपली डायरी काढून त्यात काही नोंदी केल्या आणि परत ठेऊन दिली. थोडा वेळ सगळ्या खोलीचं निरीक्षण करून रॉबिन म्हणाला “ चला आता तुमचा वडिलांच्या खोलीमध्ये जाऊन पाहूयात“

अविनाश शांतपणे मालतीताई च्या खोलीतून बाहेर पडला आणी बाजूच्या खोलीत असलेल्या त्याचा वडिलांचा खोलीकडे निघाला मागोमाग रॉबिन आणी देशमुख होतेच. खोलीला बाहेरून कडी होती. अविनाशनी ती उघडली आणी सगळे आतमध्ये गेले. आबांची हि खोली मालतीताई च्या खोलीपेक्षा लहान होती आतमध्ये एका कोपर्यात एक बेड होता आणी त्यावर चादर पांघरून आबा पाठमोरे झोपलेले दिसत होते. अविनाश आबांच्या बेडकडे जाऊन त्यांना उठवणार पण रॉबिनने अविनाशला हातानेच खुण करून त्यांना न उठवण्याविषयी खुणावलं. तसं अविनाश जागीच थांबला. बाजूला कपाट आणी टेबल आणी त्यावर बरीचशी पुस्तकं होती. बेडच्या विरुद्ध बाजूला एक खिडकी उघडी होती. रॉबिन खिडकीपाशी आला आणी बाहेर पाहू लागला खिडकीला गज न्ह्व्तेच त्यामुळे बाहेर डोकावून पाहता आलं. बाहेरचं जास्त असं काही न्हाव्तच फक्त वाड्याच कम्पौंड. दिवसाउजेडी वाड्याचा बाहेरचा भाग परत एकदा पाहावा असं रॉबिनला वाटलं आणी त्याने खिडकी लाऊन टाकली. खिडकीतून रॉबिन बाजूच्या टेबलाकडे वळला. टेबलावर वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं होती. त्यातली काही पुस्तकं घेऊन रॉबिन चाळू लागला. विविध प्रकारची प्रवासवर्णन असलेली ती पुस्तके होती. पुस्तकं आलटून पालटून पाहत रॉबिन ने परत ती टेबलावर खाली ठेवली पण ती खाली ठेवत असताना त्यांचा आवाज झाला आणि त्या आवाजासरशी बेडवर झोपलेल्या आबांनी चळवळ केली. त्यांची कदाचित झोपमोड झाली असावी. रॉबिन जागीच थांबला आणी त्यांचा बेडकडे पाहू लागला. अंगावरची चादर दूर करून आबा पुढच्या कुशीवर वळले आणी किलकिल्या नजरेने पाहू लागले. आपल्या खोली एवढी माणसं पाहताच ते तसेच किलकिले डोळे करत बेडवर उठून बसले. तसा अविनाश त्यांचा जवळ गेला. आबा उठून एकदा रॉबिन आणी देशमुख यांचाकडे पाहू लागले. अविनाश ने बाजूच्या टेबलावरील पाण्याचा तांब्या घेऊन त्यातून पाणी काढून आबांना दिले. पण आबांचं लक्षच कुठे होतं त्याचाकडे ते आपले एकसारखे रॉबिन आणी देशमुखांकडे पाहत होते.

“ आबा अहो पोलीस आहेत. तपास करायला आलेत,” त्यांना चटकन गोष्टी लक्षात येत नाहीत असं अविनाश रॉबिन कडे वळून पाहत म्हणाला.

आबा आता अविनाशने पुढे केलेल्या फुलपात्राकडे पाहू लागले आणी नंतर अविनाशकडे पण बोलले काहीच नाहीत. रॉबिन ने सगळी खोली व्यवस्थित न्याहाळली. खोलीत सामान असे काहीच न्हवते आबांची तब्येत व्यवथित नसते म्हणून त्यांना हि स्वतंत्र खोली राहायला केली होती. त्यामुळे जास्त समान असे काहीच न्हवते.

“ आबांना कधी बऱ वाटेल असं त्यांचे डॉक्टर म्हणाले. म्हणजे त्यांची स्मृती कधी परत येईल असं बोलले “ रॉबिन भिंतीला टेकून उभं राहत आबा आणी अविनाशकडे पाहत म्हणाला.

अविनाश ने दिलेलं पाणी आबांनी संपवून ते रॉबिनकडे एकटक पण निर्विकार चेहऱ्याने पाहू लागले. अविनाश ते आबांच्या हातातून फुलपात्र घेऊन ते टेबलावर ठेवलं आणी म्हणाला “डॉक्टरांचे औषधउपचार चालू आहेत त्याचं म्हणण आहे काही वेळ लागेल पण लवकरच त्यांना सगळं आठवू लागेल. आणी गोष्टींच आकलन सुद्धा होऊ लागेल. तोपर्यंत त्यांना विश्रांती घेत राहू देत आणी रोज बाहेर फिरवून आणत जावा”

“ अच्छा. अविनाश आता तुम्ही घरातल्या इतर सदस्यांना बोलावून घ्या त्यांची पण ओळख करून घेतो आणी तुम्हाला जास्त तसदी देत नाही, तुम्ही असंही आबांना बाहेर घेऊन जाणार होतात त्यात व्यत्यय नको” असं बोलून रॉबिन आबांच्या खोलीबाहेर आला. आबांना काही विचारण्यात अर्थच न्हवता. एकतर त्यांची स्मृती गेलेली होती आणी त्यांना काही नीट बोलता येईल असं वाटत पण न्हवते. देशमुखसुद्धा रॉबिन च्या शेजारी उभे राहिले. अविनाश थोड्या वेळाने बाहेर आला आणी व्हरांड्यातून सरळ गेला मधला भाग ओलांडून तो आता विरुद्ध बाजूला असलेल्या जिन्याकडे गेला. अविनाश वरच्या खोल्यांकडे इतर लोकांना बोलायला गेला हे पाहून देशमुख रॉबिन च्या कानाजवळ येऊन म्हणाले “ रॉबिन काही सुगावा मिळाला का तुला?

“ अं .. सध्या तरी नाही उलट बरेच नवीन प्रश्न मला पडलेत” रॉबिन हात मागे बांधून दरवाजाबाहेर समोर दिसणाऱ्या तुळशी वृन्दावनाकडे पाहत म्हणाला.

“ म्हणजे नक्की म्हणायचं काय तुला “ देशमुखांनी न समजून विचारलं.

“ म्हणजे वाड्याच्या आसपास जास्त कोणाचीच घर नाहीयेत. मुख्य रस्त्यापासून हि जागा जरा आतमध्ये आहे. ज्या कोणी व्यक्तीने मालतीताईचा खून केला असेल. त्याला व्यक्तीला कोणी पाहिलं असेल याची शक्यता खूप कमी वाटतेय मला आणी दुसरा असं कि ... “रॉबिन पुढे काही बोलायचा आधीच जीन्याकडून पावलांचा आवाज आला. रॉबिन आणी देशमुखांची मान तिकडे वळली.

अविनाश त्याची बायको नंदिनी, एक चष्मा घातलेला मुलगा आणी मागे एक कोणीतरी काष्टा घातलेली बाई येत होती. रॉबिन आणी इ. देशमुखांचा संवाद तिथेच थांबला. अविनाश त्यांना घेऊन रॉबिन जवळ आला.

“हि माझी बायको नंदिनी ती घरीच असते, माझा भाऊ आशुतोष पदवीच शिक्षण घेतोय आणी ह्या आमच्या कामवाल्या काकू कमलाबाई” अविनाश ने सगळ्यांची ओळख करून दिली. तसे रॉबिन ने हात जोडून सगळ्यांना नमस्कार केला.

अविनाशच्या शेजारी त्याचा भाऊ उभा होता वयाने तसा तरुण दिसत होता त्याचा चेहऱ्यावर चष्मा होता. अविनाश आणी त्याचा भावाच्या वयात बरेच अंतर असल्याची जाणीव रॉबिनला झाली. त्यांचा मागेच अविनाश ची बायको नंदिनी उभी होती अविनाश च्या मागे उभी होती, ती दिसायला विलक्षण सुंदर दिसत होती क्षणभर रॉबिन ची नजर अनावधानाने तीचावरच खिळली. रॉबिनशी तिची नजरानजर होताच तिने पटकन जमिनीकडे पहिले. नंदिनी मध्यम बांध्याची असून तिने एक साधी साडी घातलेली होती. कपाळावर बारीक टिकली आणी गळ्यात मंगळसूत्र. स्वभावाने शांत असावी अशी दिसत होती. नंदिनी शेजारी जवळच एक खेडूत दिसणारी एक बाई जिने पदर डोक्यावरून घेतला होता ती देसाई यांची घरची कामवाली कमला होती आणी जवळपास नजर रोखूनच रॉबिन कडे पाहत उभी होती.

“ मी या वाड्याचा मालकीण मालतीताई यांचा खुनाच्या संदर्भात तपास करणार आहोत आणी पोलिसांची मदत करणार आहे. तर तुम्हा सगळ्यांची ओळख करून घायला आज आलो आहे आणी तपासकार्यात तुमचं सहकार्य मिळाव अशी अपेक्षा आहे जेणेकरून लवकरच खुन्यापर्यंत आम्हाला पोहोचता येईल.” रॉबिन ने असं बोलल्यावर कोणीच काही बोललं नाही. 

“ तुम्हाला आमचे पूर्ण सहकार्य राहिलं आणी चौकशीसाठी तुम्ही कधीही वाड्यात येऊ शकता “ अविनाश सगळ्यांचा वतीने बोलला.

तेवढ्यात दारावर उभा असलेला हवालदार म्हस्के आत आला आणी देशमुखांकडे पाहत म्हणाला “ साहेब बाहेर पाटील डॉक्टर आले आहेत. आत यायचं म्हणत आहेत आबांची तब्बेत बघायला आलोय असं म्हणत आहेत “

“ ठीक आहे सोड त्यांन आत आणि तुम्ही बाहेरच थांबा “ देशमुखांनी म्हस्के हवालदाराला सांगितलं.

पाटील डॉक्टर यावेळी वाड्यावर येण्यामागे काहीतरी कारण नक्कीच असणार असं रॉबिन वाटलं. रॉबिन ने अविनाशला सगळ्यांना घेऊन परत वर जायला सांगितलं कारण सगळ्यांची ओळख झालेली होती. आणी तो अविनाश सोबत वरील मजल्यावर खोल्या पाहायला त्याचा मागे जाऊ लागला. सगळ्यात पुढे आशुतोष घाईघाईत गेला.

अविनाशने कमलाला घरी जायला सांगितलं कारण रॉबिन आल्यामुळे त्याने तिला चौकशीसाठी तिला थांबवलं होतं पण आता ओळख झाल्यानंतर तिला तिचा घरी जायला सांगितलं. अविनाशच ऐकून कमला लगबगीने वाड्याचा बाहेर गेली. रॉबिनने देशमुखांना खालीच उभा राहून डॉक्टर पाटील यांचासोबत बोलायला सांगितल जेणेकरून ते नक्की कशासाठी आले आहेत हे समजेल. बाकीचे सगळे म्हणजे रॉबिन, अविनाश आणी इतर जिन्याने वर जाऊ लागले. जिन्याने वर गेल्यावर समोर एक व्हरांडा होता. डावीकडेच अविनाश आणि नंदिनी यांची झोपण्याची खोली होती. त्याचा पुढे एक बंद खोली होती आणि त्यानंतर पुढे आशुतोष ची खोली जी खालच्या गेस्ट रूम च्या बरोबर वर होती. सगळ्यात आधी वर जाऊन आशुतोष लगबगीने खोलीत गेला आणि दाराची कडी लावली. नंदिनी तिच्या खोलीत जाऊ लागली. रॉबिन अविनाशला वर खोल्या किती आहेत वगेरे अविनाश ला विचारत होता आणी अविनाश त्याला ते सांगत असतानाच रॉबिनची नजर खोलीमध्ये जात असणार्या पाठमोर्या नंदिनी वर गेली. आणि नंदिनी हि खरोखरच एक सुंदर स्त्री असल्याच त्याचा लक्षात आला. तिचा बांधा कमनीय असून तिची चाल सुद्धा मोहक होती. त्यामुळेच ती खोलीत जाऊन दार लावत असताना तिचाकडे ओझरती नजर टाकायचा क्षणभर मोह रॉबिनला आवरला नाही. रॉबिनने सुंदर स्त्रिया कधी पहिल्या नाही अशातला भाग न्हवता पण नंदिनीच सौंदर्य काही वेगळेच होते. साधी राहणी असून पण दिसायला मोहक अशी भासत होती. अविनाश पुढे चालत होता आणी चालता चालता अविनाश एका खोलिपाशी येऊन थबकला

“इथे अडगळीच सामान ठेवतो आम्ही असं म्हणून तो रॉबिनकडे पाहू लागला. त्याचा आवाजासरशी रॉबिन ची तंद्री भंग पावली आणि ओशाळत तो म्हणाला “ अं ..काय सॉरी मी जरा विचारांमध्ये होतो. काय म्हणत होतात तुम्ही.“

“ मी म्हणलो कि हि अडगळीच सामान ठेवायची खोली. माझा खोलीच्या पुढे आणी आशुतोष च्या खोलीच्या आधीची” हाताने निर्देश करत अविनाश म्हणाला.

“ अच्छा ... आणि तिकडे विरुद्ध बाजूला ज्या खोल्या आहेत तिथे काय आहे. रॉबिनने विचारलं.

“चला तिकडे” असं म्हणून अविनाश पुढे होऊन आता विरुद्ध बाजूच्या खोल्यांकडे जाऊ लागला आणी रॉबिन त्याचामागोमागे चालू लागला. आणी दुसर्या बाजूला जाऊन पोहोचले.

“ हि खोली माझा कामाची आहे म्हणजेच विविध प्रकारची माती या पोत्यांमध्ये आणी नर्सरीच काही किरकोळ सामान या खोलीत ठेवत असतो” अविनाश ने असं सांगितलं आणी खोलीचं दार उघडल. रॉबिनने आतमध्ये बाहेरूनच डोकावून पाहिलं तर आतमध्ये मातीची बरीच पोती एकमेकांवर ठेवलेली दिसत होती. बाजूला काठ्यांचे जुडगे जे कुंपण करायला लागतात ते ठेवलेले होते. त्याला बांधायची रस्सी बाजूला पडलेली होती, आणी इतर काही बांधकामाचे किरकोळ साहित्य. रॉबिनने आत न जाताच बाहेरूनच निरीक्षण केलं.

“ आणी हि बाजूची खोली” समोर निर्देश करत रॉबिन बोलला. आणी त्या खोलीच्या पुढे जाऊन उभा राहिला.

“ ती माझी अभ्यासाची खोली आहे असं म्हणू शकता कामाच्या सामानाची यादी वगेरे करण्यासाठी, किंवा नंदिनी सोबत जरा निवांत गप्पा मारत बसण्यासाठी मी ती वापरत असतो.” अविनाश रॉबिनच्या जवळ येत म्हणाला.

नंदिनीच नाव ऐकताच रॉबिन च्या नजरेपुढे नंदिनीचा चेहरा आला आणी नंतर तिचा कमनीय बांधा. पण डोक्यातले ते विचार झटकून रॉबिन म्हणाला ” हि तुमची अभ्यासाची जी खोली बरोबर आबांच्या खोलीच्या वर आहे नाही का आणी ती पलीकडली मातीची पोती आणी इतर समान ठेवलेली खोली हि मालतीताईच्या खोलीच्या वर आहे. “

“ हो. अगदी बरोबर “ अविनाश असं म्हणून शांत बसला.

रॉबिनने तो व्हरांडा पूर्ण इकडून तिकडे न्याहाळला. व्हरांड्याच्या कठड्यावरून वरून त्याने खाली डोकावून पाहिलं. त्याला खालच तुळशी वृंदावन दिसत होतं. खालचा भाग पूर्णपणे दिसत न्हवता कारण या वरच्या व्हरांड्याच्या पुढे मधल्या भागामध्ये छत थोडे पुढे काढलेले होते त्यामुळे खालचा जास्त भाग दिसत न्हवता. त्यातला त्यात तुळशी वृंदावन दिसत होते. खाली देशमुख आणी पाटील डॉक्टर बोलत असल्याचा आवाज देखील त्याला ऐकू आला.

“ ठीक आहे, बस आता आणखी काही बघायची गरज आहे असं मला वाटत नाही. आपण आता खाली जाऊयात. वाड्यामधील ज्या गोष्टी पाहण्याची आवश्यकता मला वाटत होती तेवढ पाहून झालंय. नंतर गरज पडलीच तर इतर गोष्टींची छाननी करेनच. पण सध्या तरी मला वाटत मी खूपच जास्त वेळ घेतला तुमचा. माझामुळे तुम्हाला आबांना आज फिरायला सुद्धा घेऊन जाता आलं नाही“ रॉबिन हलकेच स्मित करत बाजूच्या भिंतींकडे पाहत म्हणाला.

“ नाही ठीक मी त्यांना उद्या घेऊन जाईनच. “ अविनाश सुद्धा स्मितहास्य करत म्हणाला.

“ ओके चला आता खाली जाऊयात आम्ही पण निघतो आता बराच उशीर झालाय”. असं म्हणून रॉबिन खाली जाण्यासाठी वळला. काही वेळात जिना उतरून रॉबिन आणी अविनाश खाली आले. खाली येताच व्हरांड्यात आबांच्या खोलीपुढे त्यांना इ. देशमुख आणी डॉक्टर पाटील बोलत उभे असलेले दिसले. रॉबिन आणी अविनाश त्यांचाकडे येताच आपलं बोलणं थांबवून त्यांनी त्यांचा माना रॉबिनकडे वळल्या.

“ काय देशमुख साहेब काय गप्पा मारत आहात “ रॉबिन देशमुखांच्या जवळ जात पाटील डॉक्टरांकडे पाहत म्हणाला.

“ हे डॉक्टर पाटील आहेत. तपास कसा चालू आहे विचारत होते “ डॉक्टर पाटलांकडे इशारा करत हलकेच गालात हसत देशमुख म्हणाले. कारण सकाळीच वेषांतर करून रॉबिनने डॉक्टर पाटलांची भेट घेतल्याचं त्यांना आठवलं.

“मी डॉक्टर पाटील, आत्ताच तुमच्याबद्दल इ. देशमुखांकडून कळल कि गुप्तहेर साहेब पण आले आहेत चौकशीसाठी” अगदीच फोर्मल पद्धतीने पाटलांनी आपली ओळख सांगत हस्तांदोलन करण्यासाठी रॉबिनपुढे हात केला” त्यासरशी रॉबिनने हसून त्यांचा हात हातात घेऊन हस्तांदोलन केलं.

त्यामुळे एक गोष्ट तरी इ. देशमुखांना स्पष्ट झाली कि डॉक्टर पाटलांना आज सकाळी भेटलेला अतरंगी म्हातारा हा वेषांतर केलेला रॉबिनच होता हे कळालेला न्हवता आणी तसंही रॉबिनने वेषांतर सुद्धा अगदी चोख केलं असल्याने पाटलांना रॉबिन हाच सकाळचा म्हातारा होता हे ओळखणे अशक्य होतं.

“ काय मग डॉक्टर भेटलात का आबांना आतमध्ये जाऊन, कशी आहे त्यांची तब्बेत आता” रॉबिनने स्पष्टच विचारलं.

“ हो आतमध्ये गेलो होतो पण ते झोपी गेलेत बहुधा मग त्यांना त्रास न देता तसाच बाहेर येऊन इ. देशमुखांशी बोलत उभा राहिलो.” शाळकरी मुलासारखं पाटील पटापट बोलून गेलो.

“ ओह्ह अस्स ... “ एवढचं रॉबिन बोलला. आणी अविनाशकडे पाहून “ चला मिस्टर अविनाश आता आम्ही तुमच रजा घेतो, तसदी दिल्याबद्दल क्षमस्व “रॉबिन हात जोडून अविनाश ला म्हणाला तसं अविनाश ने देखील हात जोडले. रॉबिन मग डॉक्टर पाटलांकडे वळून “चला डॉक्टर साहेब आपण बाहेर बोलूयात असं म्हणून वाड्याचा मुख्य प्रवेशद्वाराकडे चालायला सुरुवात केली.

वाड्याच्या बाहेर आल्यावर रॉबिन इ, देशमुख, डॉक्टर पाटील आणी हवालदार म्हस्के पोलिसांच्या गाडीपाशी उभे होते.

“ डॉक्टर पाटील तुम्ही इथे जवळच राहत असाल ना?” रॉबिनने समोरच्या रस्त्याकडे नजर टाकत विचारल.

“ हो ते काय ते समोरचे १-२ बंगले दिसतायत ना ते सोडले कि पुढे थोड्या अंतरावर माझं घर आहे “ पाटलांनी हात करत सांगितलं.

“ चला मग तुम्हाला घरापाशी सोडतो आणी तुम्हाला काही प्रश्न पण विचारयचे आहेत.? रॉबिन असं म्हणत पाटलांच्या उत्तराची वाटही न पाहता गाडीत बसला. रॉबिनने असं केल्याने पाटलांना गाडीत बसण्यावाचून दुसरं गत्यंतरच उरलं नाही. रॉबिन बसल्यानंतर बाकीचे सगळे गाडीत बसले आणी हवालदारांनी गाडी चालू केली.

बाहेर चांगलाच अंधार पडलेला होता, हलकी थंड अशी वाऱ्याची झुळुक सुद्धा वाहत होती. गाडीत देशमुख पुढच्या बाजूला हवालदारांच्या सोबत बसले होते, रॉबिन आणी डॉक्टर पाटील मागच्या बाजूला. रस्त्यावर जास्त पक्का न्हवता त्यामुळे हवालदार म्हस्के गाडी सावकाश पुढे नेत होते.

“ वाड्यावर चौकशी केल्यावर असं समजलं कि मालतीताई जेव्हा जमिनीवर कोसळल्या तेव्हा तुम्हाला वाड्यावर बोलावलं होतं “ रॉबिनने समोर रस्त्याकडे पाहतच पाटलांना प्रश्न विचारायला सुरुवात केली.

“ अं .. हो ... “रॉबिनकडे हलकेच पाहत पाटलांनी उत्तरं दिलं. पोलिसांच्या गाडीत बसायची पाटलांची कदाचित पहिलीच वेळ असावी, रॉबिन अशी प्रश्नोत्तरे करतोय म्हणून त्यांना थोडासा दडपण आलेलं होतं. त्यामुळे आपला चष्मा सावरत अंग चोरून पाटील बसले होते.  

“ डॉक्टर साहेब जेव्हा तुम्ही मालतीबाईंच्या वाड्यावर त्या कोसळल्या म्हणून तपासायला गेल्या तेव्हा काय काय पाहिलंत तुम्ही हे जरा सविस्तर सांगू शकाल का? रॉबिनने मागे टेकत आणी नजर समोर रस्त्यावर ठेवूनच पाटलांना विचारलं.

रॉबिनच्या या प्रश्नानंतर पुढे बसलेल इ. देशमुख थोडेसे सरकून गाडी चालवणाऱ्या हवालदाराकडे तोंड करून कान मागच्या सीटकडे बाजूला करून बसले जेणेकरून पाटील काय म्हणतायत हे स्पष्टपणे ऐकू यावं. थोडं थांबून पाटलांनी सांगायला सुरुवात केली.

“ त्या दिवशी जवळपास संध्याकाळच्या सुमारास एक जवळपासचा स्थानिक माणूस माझा क्लिनिक मध्ये जे कि घराला लागुनच आहे तिथे धावत पळत आला आणी देसाई वाड्यावर मालतीताई जमिनीवर पडल्यात असं सांगत आला. मी तत्क्षणी माझा क्लिनिक मधून पळत वाड्याकडे निघालो. तिथे पोचतो तर मुख्य दरवाजाजवळ काही लोकं थांबलेली पहिली. त्यांना बाजूला करून आतमध्ये गेलो. मालतीताई यांचा खोलीबाहेर कमला आणी त्यांची सून नंदिनी घाबरून उभ्या होत्या. मला कमला ने सांगितलं कि मालतीताई येथे पडलेल्या तिने पहिल्या आणी हाका मारली तरी उठेनात. मी पुढे जाऊन त्यांचा खोलीत पाहिलं तर मालतीताई जमिनीवर काहीशा उताण्या अवस्थेत पडल्या होत्या. मी त्यांना जोरजोराने हाका मारल्या तरी मला त्यांचाकडून काही रिस्पोंस येईना. मग मी त्यांचा जवळ जाऊन त्यांना खांद्यला स्पर्श करून हलवलं. तरीही त्या उठेनात. मग मी त्यांचा हात पकडून नाडी पहिली तर मला ती जाणवलीच नाही तसा मी घाबरलो. “ एवढं बोलून डॉक्टर पाटील थांबले.

“ अच्छा म्हणजे मालतीताई मेल्या आहेत असं तुम्हाला वाटलं तर “रॉबिनने हाताची घडी घालत विचारलं.

“ शंका आली होती मला पण नाडी लागली नाही म्हणून मी गळ्याचा इथे नाडी लागते का ते पाहण्याचा प्रयत्न करू लागलो तर मला मालतीताई यांचा मानेजवळ एक छोटासा रक्ताचा थेंब दिसला दिसला आणी मला जरा वेगळाच संशय आला, म्हणून मग मी कर्तव्यदक्षपणे पोलिसांना फोन लावला.” पाटील सभ्यपणाने बोलत म्हणाले.

“ बर मग पुढे “ रॉबिन शांतपणे म्हणाला.

“ पुढे काय... पोलिसांनी म्हणजेच या देशमुख साहेबांनी त्यांची कारवाई उरकली, समोर बसलेल्या इ. देशमुखांकडे हात करत पाटील म्हणाले. नंतर मालतीताईना हॉस्पिटल मध्ये नेलं. हॉस्पिटल मधून फोन आला कि मालतीताई यांचा मृत्यू झालाय, त्यांना मृत्यू काहीसा संशयास्पद वाटल्याने पोस्टमार्टेम करावं लागेल असं त्यांनी सांगितलं. मग मी अविनाशशी चर्चा करून सांगितलं कि हॉस्पिटल मधले डॉक्टर्स पोस्टमार्टेम करायचं म्हणत आहेत. त्याने सुरुवातीला याची काय आवश्यकता आहे म्हणून विरोध केला पण हॉस्पिटलची हि प्रोसिजर असते असं मी त्याला सांगितलं मग तो तयार झाला. एवढ बोलून पाटील शांत बसले.

“ तुमचं काय मत आहे डॉक्टर कशामुळे मृत्यू झाला असेल मालातीताई यांचा” पाटलांकडे पाहत रॉबिन म्हणाला. आणी त्याची नजर पाटलांच्या प्रत्येक हालचालींकडे होती. कपाळावर आलेला घाम पाटलांनी हातानेच पुसला. आणी “ मला काही सांगता येणार नाही” असं बोलले.

तेवढ्यात गाडी पाटील राहतात तिथे येऊन पोचली, घराजवळ गाडी येताच इथे थांबा असं म्हणाले. त्यांचा सांगण्यासरशी हवालदार म्हस्केंनी गाडी बाजूला उभी केली तसं पाटील लगबगीने गाडीतून उतरले, उतरताच त्यांना जरा बऱ वाटला कारण रॉबिन च्या प्रश्नोत्तरांनी त्यांना घाम फोडला होता. डॉक्टर पाटील यांचा मागोमाग रॉबिन पण उतरला आणी पाटलांच्या मागोमाग त्यांचा घराच्या दाराजवळ आला. त्याने उतरताना देशमुखांना गाडीच्या आतमधेच बसायला सांगितलं.

“ अच्छा इथे राहता तर तुम्ही ..” समोरील घराकडे पाहत रॉबिन म्हणाला.

रॉबिन असा अचानक त्यांचामागून गाडीतून उतरलेला त्यांना कळाल नाही त्यामुळे मागे वळून आणी बिचकून पाटील “ अं..हो..हो “ एवढचं म्हणाले. रॉबिन असा अचानक खाली उतरल्यामुळे पाटलांना काय बोलावे ते सुचेना. समोर पाटलांचे घर होते आणी ते घरात एकटेच राहत असावे कारण घरातून कोणी बाहेर आलं नाही. रॉबिन डॉक्टर पाटील यांचा नजीक उभा राहिला आणी बोलू लागला“ हे बघा डॉक्टर, मालतीताई यांचा मृत्यू एका ठराविक विषसदृश रासायनिक पदार्थामुळे झालेला आहे. तो पदार्थ कोणता असेल याचा पत्ता फोरेन्सिक खात्याला सुद्धा लागलेला नाहीये, तुम्ही देसाई कुटुंबियांचा बरेच जवळ आहात तेव्हा तुम्हाला त्यांचा घरची इत्यंभूत माहिती असेल. तसचं अशी कोणती माहिती जी या खुनासंदर्भात तुम्हाला असल्यास मला नक्की सांगावी जेणेकरून तपासकार्यात मला मदत मिळेल. आणी कोणतीही माहिती तुम्ही न लपवता मला सांगावी असं मला वाटत, माझी मदत हवी असेल मला तसं सांगा पोलिसांना मध्ये न घेता ती माहिती आपल्या दोघात राहील याची खात्री मी तुम्हाला देतो. कारण पुढे जाऊन जर हि माहिती पोलिसांना मिळाली आणी त्यात संशयाची सुई तुमचाकडे वळली तर... थोडं थांबून पोलिसांच्या गाडीकडे पाहून आणी परत पाटलांकडे वळत रॉबिन म्हणाला. पोलिसांची तपासाची पद्धत आणी संशयितांना हाताळण्याची पद्धत तुम्हाला माहित असेलच. त्यामुळे काही सांगायचं असेल तर हीच वेळ आहे.” रॉबिन दोन्ही हात मागे बांधून पाटलांकडे निरखत उभा राहिला. डॉक्टर पाटील पूर्ण घामाने भिजलेले होते त्यांचा तोंडातून शब्दहि फुटला नाही. रॉबिन दिलेल्या इशाऱ्यामुळे तर त्यांची पूर्ण भंबेरीच उडालेली होती.

“ अं...म..मी..म.. मला जे माहिती ते सगळं सांगितलं आहे रॉबिन साहेब, “ अतिशय चाचरत पाटील म्हणाले.

“ तसं असेल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाहीये, आणी कोणती माहिती तुम्हाला द्यावी वाटली तर सरळ माझाकडे येऊ शकता किंवा मला सांगू शकता” असं बोलून रॉबिनने पाटलांना आपला घरचा फोनक्रमांक दिला आणी त्यांना जायला सांगितलं. शांतपणे काहीही न बोलता पाटील घराकडे वळले. रॉबिन गाडीमध्ये येऊन बसताच त्याने गाडी सुरु करायला सांगितली. लगेचच हवालदारांनी गाडी सुरु केली.

“ काय झालं रॉबिन पाटलांशी काय बोलत होतास तू..” गाडी चालू होताच इ. देशमुखांनी विचारलं.

“ काही विशेष नाही देशमुख साहेब बस्स डॉक्टर पाटलांना गुन्ह्याचं गांभीर्य सांगितल आणी काही माहित असेल तर पोलिसांना मदत करा असं म्हणालो” पाठीमागे रेलत आणी शरीराला झटके देत रॉबिन म्हणाला.

“ ओह्ह तुला काय वाटत पाटलांना काही विशेष माहिती असेल का या प्रकरणात” देशमुखांनी रॉबिनकडे पाहत विचारलं.

“ शक्यता नाकारता येत नाही, तसंपण अंधारात तीर मारला आहे मी.. बघू काय होतंय ते “ रॉबिन हलकेच स्मित करत म्हणाला आणी गाडीच्या बाहेर पाहू लागला. बाहेर चांगलाच अंधार पडलेला दिसत होता. गाडी मुख्य रस्त्यावर आली होती आणी रस्त्यवरचे दिवे लक्ख प्रकाशात उभे होते. रॉबिन विचारमग्न झालेला असल्याने देशमुखांनी त्याला जास्त काही विचारले नाही. थोड्या वेळाने गाडी रॉबिन च्या घरापुढे आली. रॉबिन गाडीतून खाली उतरला आणी देशमुख बसले होते तिथे दरवाजाजवळ गेला.

“ प्रकरण वाटत तितके सोपे नाहीये देशमुख साहेब, बराच काथ्याकुट करावा लागणार असं दिसतंय” दरवाजावर हात ठेवत रॉबिन म्हणाला.

“ हम्म.. तू म्हणतोयस त्याची कल्पना आलीय मला” देशमुख गाडीमध्ये बसूनच म्हणाले.

“ आपल्याला दोन गोष्टी समजल्या म्हणजे या खुनाचा सूत्रधार कोण आहे समजू शकेल देशमुख” रॉबिन म्हणाला.

“ त्या कोणत्या ..कपाळावर आठ्यांच जाळ आणत देशमुख म्हणाले.   

“ एक म्हजे ज्या कोणत्या शस्त्राने खून केला गेलाय ते शस्त्र आणी खुन करण्यामागच मागचं कारण” रॉबिन म्हणाला.

“हुश्श असं करत देशमुख म्हणाले- त्या दोन्ही गोष्टी सध्यातरी आपल्याकडे नाहीत. रॉबिन लवकरच आपल्याला या दोन्ही गोष्टी मिळवाव्या लागतील.

“ लवकरच मिळतील त्या आपल्याला देशमुख साहेब, तुम्ही फक्त तुमचा तपास चालू ठेवा. कारण संशय हा सगळ्यांवर आहे. मालतीताई यांना मारून बऱ्याच जणांना बदला घायचा असेल. कोणालासुद्धा संशयातून सूट देता कामा नये “ हात झटकत रॉबिन म्हणाला.

“ ठीक आहे रॉबिन मी मालतीताई यांचा राजकीय वर्तुळात जरा चौकशी करतो त्यांचा कामाबद्दल थोडी माहिती घेतो, त्यांचे कोणी विरोधक होते का असल्यास कितपत विरोध करणारे होते. देशमुख म्हणाले.

“ हम्म..राजकीय व्यक्ती कोणच्यातरी खांद्यावर बंदूक ठेवून असा घातपात करू शकतात. पण खून घरात झालेला असल्याने कोणाची तरी मदत घेऊन हे कृत्य करता येऊ शकते. सर्व शक्यता पडताळून घ्यायला काहीच हरकत नाहीये.” रॉबिन हनुवटीवर हात ठेवून म्हणाला.

“ बर चला आता उशीर झालाय, उद्या बोलूयात असं म्हणून इ. देशमुखांनी रॉबिनचा निरोप घेतला. आणी रॉबिनसुद्धा आपल्या घराकडे जायला वळला.

क्रमशः

गुप्तहेर रॉबिन आणी कुटीरोवांचं शस्त्र - भाग २

 

उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला होता. रस्त्यावरून चाकरमान्यांची कामाच्या ठिकाणी जायची लगबग चालू होती. सकाळी अगदी नऊच्या सुमारास या बागेमध्ये लहान मुले आणि बिनकामाचे म्हातारेकोतारे लोक फेरफटका मारायला येत. त्यातले काही आपापल्या नातवांना घेऊन येत तर काही म्हातारे पाय मोकळे करायच्या नावाखाली मुलांच्या किंवा मुलींच्या संसारातील कागाळ्या एकमेकांना सांगायला येत असत. बाग तशी खूप मोठी होती. दुपारी १-४ काही तास बंद असायची आणी सकाळी ६ वाजताच उघडायची. आजसुद्धा बागेमध्ये बऱ्यापैकी लहान मुले आणी म्हातारी माणसे यांची गर्दी होती. सकाळचे कोवळे उन जाऊन आता त्याची जागा कडक उन्हाने घेतली होती. बागेमध्ये फिरणारे वयोवृद्ध आता फिरायचे सोडून झाडाखालच्या बाकांकडे जाऊन विसावू लागले होते. अशाच एका बाकावर डॉक्टर पाटील हाताच्या बोटांचा चाळा करत समोरच्या घसरगुंडीवर खेळत असलेल्या लहान मुलांकडे बघत बसलेले होते. त्याचं वय साधारण ३८ किंवा ४० असावे, डोळ्यावरचा चष्मा सारखा करत डॉक्टर पाटील समोर पाहत कसल्यातरी विचारात गढलेल दिसत होते.

तेवढ्यात खाकखाख असं खाकरत एक वयोवृद्ध झालेला एक म्हातारा पाटील डॉक्टरांच्या जवळ येऊन उभा राहिला. पाटील अजूनही समोरच्या लहान मुलांकडे एकटक पाहत बसलेले होते.

“ इथे कोणी बसलं आहे काय बाळा...” घसा खाकरत तो म्हातारा पाटलांच्या शेजारील रिकाम्या जागेकडे निर्देश करत म्हणाला.

त्या वाक्यासारखी पाटील डॉक्टर भानावर आले.

“ अं...क.. काय म्हणालात आजोबा ..” काही न कळून भानावर येत पाटील म्हातार्याकडे पाहत म्हणाले.

चेहऱ्यावर सुरकुत्या, डोक्यावर पिकलेले केस, अंगात एक पांढरा सदरा आणि खाली एक कळकट्ट धोतरं अशा वेशातील त्या म्हातार्याकडे पाहून पाटलांनी आपल्या चेहऱ्यावरचा चष्मा सारखा करत एक कटाक्ष टाकला.

“ अरे तुझा बाजूला कोणी बसलं आहे का? असं विचारत होतो मी” असं म्हणत आणि पाटलांच्या उत्तराची वाटही न पाहता तो म्हातारा पाटलांच्या शेजारी जाऊन बसला. पाटील काही बोलणार एवढ्यात त्या म्हातार्याने एक पाय खाली सोडून आणि दुसरा पाय दुमडून घेऊन त्या बाकावर बस्तान मांडले. सदरा थोडा वर करून आतून चोर कप्प्यातून कसलीतरी मळकट पुडी बाहेर काढून त्यातली तंबाखू हातावर घेत नंतर डबीतून चुना काढत त्या म्हातार्याने तंबाखू मळायला सुरुवात केली. डॉक्टर पाटील त्या म्हातार्याकडे पाहतच राहिले. असं अगदी शेजारी बसून तंबाखू मळत बसलेल्या म्हातार्या माणसाला पाहून त्यांना जरा चिडच आली पण त्या म्हाताऱ्याचं वयं पाहता पाटलांनी शांतपणे नाकावर येणारा चष्मा सरळ करत विचारलं “अहो आजोबा शेजारी कोणी बसलं आहे कि नाही हे मी नं सांगताच बसला तुम्ही”

“ असुदे रे कोणी न्हवत बसलं इथे, मी पाहिलं होतं दुरून, मी आपलं उगा विचारायचं म्हणून विचारलं. तुम्हा शहरातल्या माणसांना असं विचारून बसावं लागतं. माझा पोरगा म्हणाला होता मला” म्हातारा तंबाखू मळत पाटलांकडे न पाहताच बोलला. 

“ ओह्ह अच्छा ... म्हणजे या शहरात नवीन आहात तर तुम्ही “ पाटील जरा सावरत म्हणाले.

“ हा तसं हायेच .. मागच्याच हप्त्यात माझा पोराकडे आलोय मी हे काय पलीकडच्या दोन बिल्डिंगा सोडून घर आहे माझा पोराचं. नातवाचा वाढदिवस आहे म्हणून आलो. नायतर आमी काय गावाकडे असतो...” बोलता बोलता म्हातार्याने तंबाखू मळून व्यवस्थित पणे तोंडात ठेवली. आणी हात झटकू लागला.

“ अच्छा ... “ एवढ म्हणून पाटील जरा सावरून बसले. खरतर या म्हातार्याचा येण्याने त्यांची तंद्री भंग पावली होती.

“ तू काय करतो रे पोरा” म्हातार्याने तंबाखू चघळत पाटलांना विचारलं. आता म्हातारा काही स्वस्थ बसू देणार नाही असं पाटलांना वाटला कारण गावाकडून आलेले म्हातारे हे एकदा बोलू लागले कि थांबता थांबत नसत. आता या गपिष्ट म्हातार्याशी बोलण्यावाचून गत्यंतर नाही असं वाटून पाटील बोलू लागले.

“ मी डॉक्टर आहे आजोबा “

“ अरा बापरे म्हणजे मोठा माणूस हाय रे तू “ म्हातारा डोळे मोठे करत म्हणाला.

“ तसं काही नाही इतर डॉक्टर लोकांसारखाच आहे” शक्य तितक्या हळू आवाजात पाटील म्हणाले.

“ नाई म्हणजे आप्रेशन बिप्रेषन करन म्हणजे काय सोप्पं काम नाही गड्या, ते तुम्हा लोकांना जमतं म्हणजे मोठच कि तुम्ही” म्हातारा डोळे मिचमिच करत बोलला.

“ अहो नाही आजोबा सर्जन नाहीये मी, जनरल फ्यिजिशिअन आहे मी.” डॉक्टर पाटील स्पष्ट शब्दात आणी काहीशा मोठ्या आवाजात म्हणाले.

“ ऑ.. काई ते ..” पाटलांच्या इंग्रजीत केलेल्या त्या शब्दांचा उल्लेखाचा उलगडा न झाल्याने म्हातारा कडू तोंड करत म्हणाला.

“ अ.. म्हणजे ऑपरेशन करणार डॉक्टर नाही, आजाराची लक्षण पाहून औषध गोळ्या देणारा डॉक्टर आहे मी “ पाटील स्मितहास्य करत म्हणाले. हि आपली ओळख सांगताना आपण स्मितहास्य करत आहोत हे पाटलांच्या लक्षात येताच पाटील दुसऱ्या क्षणाला शांत बसून समोर पाहू लागले.

“ हम्म...म्हंजे साधा डाक्टर आहेस तर ...” ओठ एकमेकांवर दाबत म्हातारा आपल्या सदराच्या आत काहीतरी शोधू लागला. अतिशय कुत्सितपणे आपला साधा डॉक्टर म्हणून केलेला उल्लेख पाटलांना मुळीच आवडला नाही. थोडक्यात म्हातार्याचे ते ‘साधा डॉक्टर’ हे शब्द त्यांचा वर्मी घाव करून केले. न राहवून पाटील म्हातार्याला म्हणाले.

“ एक मिनिट आजोबा.. अहो फक्त क्रिडेन्शिअल पाहून तुम्ही अमुक डॉक्टर साधा कि भारी असं नाही ठरवू शकत” नाकावर सरकणारा चष्मा सरळ करत पाटील जराश्या घुश्यातच म्हणाले. तो म्हातारा अजूनही सदर्यात हात घालून काहीतरी शोधतच होता. आणि पाटील अजूनही त्या म्हातार्याकडे पाहत उत्तराच्या अपेक्षेने तोंड अर्धवट उघडे ठेवून पाहत होते. शेवटी त्या म्हातार्याला सदर्यात जे पाहिजे होते ते सापडले ते मिळाले.

आणी पाटलांकडे बघत तो म्हातारा म्हणाला ” हे बघ पोरा ते किडे बिडे का काय ते तू जे म्हणालास ते मला काय कळत नाय बघ आम्हा गावाकडच्या लोकांचं कसं असतंय आप्रेशन करणारा डाक्टर म्हणजे भारी एवढचं गणित असतंय त्याचं“ म्हातार्याच्या या उत्तरावर आता मात्र पाटील डोक्याला हात लावून बसले. हा म्हातारा चांगलाच डोकं खाणारा आहे हे त्यांना कळून चुकलं. साला काय कटकट आहे. बागेत नेहमीप्रमाणे फेरफटका मारून शांतपणे बाकावर बसायचो आज काय हि ब्याद उपटली असं वाटून पाटील डोकं खाजवत समोर पाहत शांत बसले. म्हातार्याने पाटलांकडे पाहिलं आणी त्याला जाणवलं कि पाटील दुखावले गेले आहेत. तसं तो समजुतीच्या स्वरात म्हणाला

“ अरे पोरा आमच्या सारख्या म्हातार्या माणसाचं बोलण काय मनाला लाऊन घेतोस रे... आम्हाला काय कळतय त्यातलं बाबा, तू सुद्धा मोठाच असचील “

म्हातार्याचा या सावरासावरीने पाटलांच काही समाधान झालं नाही उलट डॉक्टर पाटील बसल्या जागीच पाय हलवत जरा रागातच समोर पाहू लागले. पाटलांची शांतता म्हातार्याला काही रुचली नाही तेव्हा तो म्हातारा अजून पुढे म्हणाला. “ अरे बाबा माणसांना जीवदान देणारे सगळ डाक्टर सारखेच. फक्त त्यातल्या त्यात जाणारा जीव वाचवा म्हणून धडपड करणारा डाक्टर खरा मोठा बघ “ म्हातारा उगाचच दात दाखवत म्हणाला.

“ मी सुद्धा तसाच डॉक्टर आहे आजोबा, या भागातला एक प्रतिष्ठित आणी नावाजलेला आणी कित्येकांचा फॅमिली डॉक्टर आहे मी. माझा उपचारांचा गुण बर्यचा जणांना येतो. पाटील त्या म्हातार्यावर नजर रोखून म्हणाले.

“ अस्स काय.. असेल हो.. काई सांगू’ बाबा आजकाल जीवाचा काई भरवसा नाही, खूप स्वस्त झालाय बग. कालच्याला आमचा शेजारचा बोबडे नावाचा एक शेजारी आहे तो सांगत होता एक बाई मेली खालच्या गल्लीतील. म्हातारा जरा आठवल्यासारख करत म्हणाला. म्हातार्याच्या तोंडून बाई मेली असा उल्लेख ऐकून पाटील जरा गंभीर झाले. त्या बाईचा मृतदेह मीच तपासला असं सांगून या म्हातार्याला गप्प करावं अशा उद्देशाने पाटील म्हणाले –

“ हो त्या बाईंचा मृतदेह मीच तपासला होता आणि त्या मृत झाल्याचं मीच घोषित केलं होतं, कारण मी त्यांचा जवळच राहतो आणि त्यांचा घरातल्यांचं कोणाचही आजारपण आल्यास मलाच बोलावतात.” पाटील जरा मान ताठ करत म्हणाले.

“ काई सांगतो काय ..” जरा मोठ्याने बोलत तोंडातून एक पिचकारी बाजूला मारत म्हातारा आता सरळ पाय करून बाकावर बसला. .. माणूस मेलाय हे तुला समजला लेका वेळेवर..  म्हणजे तू तर मोठा डाक्टर असला पाईजे रे...

म्हातार्याने आपला या वेळी मोठा डॉक्टर असा उल्लेख केलेला ऐकून पाटील मनातून सुखावले पण त्यांनी चेहऱ्यावर तसं दाखवलं नाही. म्हातारा उगाच काहीतरी खोचक बोलेल म्हणून पाटील यावेळी शांतच बसले. पण म्हातारा काही शांत बसायचा मूड मध्ये न्हवता.

“ अरे मग काय झालं काय हुत तिथे नक्की तुला कस कळल ती बाई मेलिय ते, आता तुला त्यांनी बोलावलं म्हणजी नक्कीच तू हुशार असला पाईजे बाबा “ म्हातारा आ वासून पाटलांकडे बघत म्हणाला. परत एकदा हुशार असा उल्लेख झालेला पाहून पाटील मनोमन सुखावले. आणी देसाई कुटुंबीयांकडे त्यांनाच कसं बोलावलं गेलं याबद्दल सांगू लागले.

“ काही नाही आजोबा मी आधीच तुम्हाला सांगितलं सागितलं मी इथला खूप नावाजलेला आणि प्रतिष्ठित डॉक्टर आहे. मी अनेकांचा फॅमिली डॉक्टर आहे तसाच त्या मेलेल्या बाईंचा घरच्यांचा सुद्धा होतो. मी आपला आपल्या क्लिनिक मध्ये बसलो होतो तेव्हा बाहेर अचानक मला आरडाओरडा ऐकू आला तसा बाहेर आलो. बाजूच्या कोणीतरी मला मला सांगिलते कि समोरच्या बाईला भोवळ येऊन ती खाली पडली तुम्ही चला. आजूबाजूला इतर कोणीही माझा इतका नावाजलेला डॉक्टर न्हवता त्यामुळे ते कदाचित माझाकडे आले असावेत मी तडक यांचा वाड्यात गेलो. तर ती बाई जमिनीवर तिचा खोलीत पडली होती तिचे ठोके लागत न्हवते नाडी बंद होती. मी स्टेथेस्कोप ने तपासलं तर जिवंत असण्याचा एकही पुरावा दिसत न्हवता”

“ मंग काय केलं तू .. “ पाटलांच वाक्य मधेच तोडत म्हातारा बोलला.

“ मग काय तेव्हा. मला जरा शंका आली मग मीच हॉस्पिटल मध्ये हलवा असं सांगितलं “ पाटील हाताची घडी घालत समोर पाहत गंभीरपणे म्हणाले.

“ अररर बिचारीला अटाक आला असणार बघ... मी म्हणालो ना रे डाक्टर, आजकाल जीवाचा भरवसा नाहीच बघ. आमचा शेजारी बोबडे थेरडा उगाचच काहीही उठवतो कि खून झाला म्हणून “ म्हातारा उगाचच कसनुस तोंड करत म्हणाला.”

“ अहो आजोबा खुनच झालेला होता त्या बाईचा, आणी बिचारी वगेरे कसली हो चांगलीच पाताळयंत्री बाई होती ती” पाटील त्रासिक सुरात समोर पाहत म्हणाले.

“ अह... अस्स होय...” तोंडावरचा घाम धोतर्याचा सोग्याने पुसत विचित्र चेहरा करत म्हातारा खाली पाहू लागला.

म्हातार्याला खून हा शब्द ऐकून धडकी भरली असावी. म्हणूनच घाबरून तो खाली पाहत असावा. असं वाटल्याने पाटलांना जरा आवेश चढला. आणि ते म्हणाले “ अहो आजोबा घाबरू नका, इथे काय दिवसाढवळ्या खून दरोडे घडत नाहीत. आणी माझासारख्या नावाजलेल्या डॉक्टर सोबत तुम्ही या बागेत मध्ये बसलेले असताना तुम्हाला कोण काय करणार” नाटकी हसत हसत पाटील म्हणाले.

म्हातारा अजूनही जमिनीकडे पाहताच होता. पाटील त्याच्कयाचडे पाहत होते. काय पण म्हातारा आहे राव खून म्हटलं कि घाबरतो.

थोड्या वेळाने तो म्हातारा खाली पाहतच म्हणाला “ अरे पोरा मी घाबरलो नाही फक्त ईचार करतोय कि तू एवढ्या खात्रीने कसं काई बोलला कि खूनच झाला होता म्हनून, कारण तुला तर बाईला भोवळ आलीय आन ती जमिनीवर पडलीय म्हणून बोलावलं होतं ना ? एवढ बोलून म्हातार्याने पाटलांकडे साशंक नजरेने पहिले. त्या म्हातार्याची ती नजर पाहून पाटील अवाकच झाले. म्हणजे हा म्हातारा आपल्यावर संशय घेतो याची हिम्मतच कशी काय झाली. असं वाटून पाटील पुढे बोलले.

“ हे बघा आजोबा मी एक डॉक्टर आहे आणी डॉक्टरांना शरीरशास्त्रातील सगळं कळत. त्या बाईंचं शरीर पूर्णपणे आखडल होतं अगदी काही मिनिटातच, हृदयक्रिया बंद पडल्याने असं काही लक्षण दिसत नाही. आणी तिच्या मानेवर सुद्धा रक्ताचा थेंब होता जणू काही कोणीतरी जबरदस्तीने इंजेक्शन देऊन मारलं असावं असा. अर्थात त्यावेळी मी कोणालाच काही सांगितल नाही. आणि ती काय साधीसुधी बाई वाटली काय तुम्हाला. अहो मोठी पोचलेली राजकारणी बाई होती ती बऱ्याच लोकांचं नुकसान केलं होत तिने. घेतला असेल कोणीतरी तिचा बदला. तुम्हाला काय माहिती नवीन आहात तुम्ही इथे “ रागारागात एवढ बोलून पाटलांनी आपली मनगटावरच्या घड्याळात पहिले १० वाजून गेले होते. आज सकाळ सकाळ म्हातार्याने खूप डोक्याला ताप दिला.

“ तुमचं पन चांगलंच नुकसान केलेलं हुतं वाटतं त्या बाईने, एवढं तावातावाने बोलताय ते “ म्हाताऱ्याने तोंडातून एक पिचकारी बाजूला मारून धोतराने तोंड पुसलं. आणी उगाचच नजर रोखून पाटलांकडे बघू लागला. पाटलांनी त्या म्हातार्याकडे पहिले त्यांना त्या म्हाताऱ्याची नजर विचित्र वाटली. बोलता बोलता आपण बरंच काही बोलून गेलो. याची खंत त्यांना वाटून पाटील हाताच्या मुठी आवळून आखडून बसले. या म्हातार्याचा टकळी पासून सुटका करून घ्यावी म्हणून ते जागेवरून उठले, आणी उगाचच मनगटावरच्या घड्याळात पाहत म्हणाले

“ चला मी निघतो माझी दवाखान्यात जायची वेळ झाली” आणि त्या म्हातार्याकडे न पाहतच चालू लागले. बागेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोचल्यावर पाटलांना जरा हायसं वाटलं, बाहेर पडताना उगाचच त्यांनी आपण मगाशी बसलेल्या बाकड्याकडे नजर वळवली. तर तो म्हातारा बागेच्या मुख्य प्रवेशद्वाराकडेच एक पाय बाकावर ठेवून नजर रोखून एकटक त्यांचाचकडे पाहत होता. पाटलांनी तिथून लागलीच काढता पाय घेतला.

आता संध्याकाळ होत आली होती, इन्स्पेक्टर देशमुखांची गाडी पोलीस स्टेशन पासून निघाली. त्यांना तडक रॉबिनला भेटण्यासाठी त्याचा घरी जायचं होतं. मालती देसाई खून प्रकारणाच कामकाज म्हणावं तसं वेग घेत न्हवते. कोणतीच महत्वाची माहिती पुढे येत न्हवती. पण आता रॉबिन नी तपासकार्यात हातभार लावायचं ठरवल्यामुळे तपास करण सोप्पं पडणार होतं. काही वेळाने पोलिसांची गाडी रॉबिन च्या घरापुढे थांबली आणी त्यामधून देशमुख रुबाबात खाली उतरले सोबतच्या हवालदाराला त्यांनी गाडीजवळच उभं राहायला सांगितलं आणि ते एकटेच रॉबिन च्या घराच्या दरवाजाजवळ आले. दार अर्धवट उघडच असल्याने ते सरळ आत लोटून इ. देशमुख आत आले आणी समोर चे दृश्य पाहून जरा चपापलेच. आतमध्ये एक म्हातारा खुर्चीत बसून टेबलावर त्याचा दोन्ही तंगड्या टेबलावर पसरून आरामात सिगारेट ओढत बसला होता.

“ अ ... आपण कोण आणी रॉबिनच्या घरात काय करताय ...” इ. देशमुखांनी आश्चर्याने विचारलं.

देशमुखांनी बोलताच समोरचा म्हातारा खळाळून हसला. आणी त्याने डोक्यावरचा पांढर्या केसांचा विग आणी नकली पांढर्या मिशा समोर टेबलावर काढून ठेवल्या. आणी आपले केसं एका हाताने व्यवस्थित करू लागला.

“ ओह्ह .. रॉबिन तू ..अरे मी ओळखलंच नाही तुला” देशमुख चेहऱ्यावर हास्य आणत म्हणाले. तसं देशमुखांना माहित होतं कि काही विशेष कारण असल्यास रॉबिन वेषांतर करून तपास करतो. तरीपण आत्ता त्याला हे सोंग आणावयाची गरज काय पडली ते समजेना.

“ चला म्हणजे तुम्ही मला ओळखलं नाही म्हणजे म्हातार्याचे सोंग झकास जमले होते तर “ रॉबिन देशमुखांना म्हणाला आणी आपल्या नकली मिशा आणी बाजूला सरकवून ठेवल्या.

“ पण मला एक सांग रॉबिन, हे अचानक असं सोंग का घेतलस बाबा “ देशमुखांना आपलं कुतूहल लपवता आलं नाही.

“ काही नाही हो इन्स्पेक्टर साहेब मला वाटला मालतीताई यांच्या खुनाची चौकशी आधी बाहेरून करावी “

“ पण असं करावं असं वाटण्यामागे काही विशेष कारण ?’ देशमुखांनी विचारलं.

“ हा..म्हणजे मला असं वाटलं कि मृत व्यक्ती स्वभावाने किंवा व्यक्तिमत्वाने कशी होती याची विचारणा बाहेरून करून घ्यावी अर्थात ती नेहमीप्रमाणे सरळ मार्गाने नं करता या विशिष्ट पद्धतीने. आणी तसंही या प्रकरणात प्रतिष्टीत व्यक्तीचा समावेश असल्याने त्याबद्दलच्या ना ना प्रकारच्या वावड्याच जास्त उठतात. केस चा तपास सुरु करण्यापूर्वी या वावड्या काय असू शकतात त्यात तथ्यांश किती याची चाचपणी करणे गरजेचे होते. लोक पोलिसांना किंवा कोणत्याही खाजगी गुप्तहेराला अशा गोष्टी सरळ सांगत नाही म्हणूनच त्या जाणून घेण्यासाठी हा खटाटोप. “ टेबलावरील नकली केसांच्या विगकडे निर्देश करत रॉबिनने सिगरेटचा एक दिर्घ झुरका घेतला.

“ ओह्ह ... असं आहे तर मग तुझा हाती काय लागलं. तसं पोलीस खात्याने सुद्धा त्यांचा परीने बाहेर चौकशी केली होती. पण आता तू म्हणतोयस कि लोक सगळ्याच गोष्टी पोलिसांना स्पष्ट सांगत नाहीत तर तुला नक्की काहीतरी सापडलं असेलच “ देशमुखांनी विचारणा केली.

“ काही गोष्टी समजल्या. ठरल्याप्रमाणे मी डॉक्टर पाटलांना म्हातार्याचा वेशात बागेत सकाळ सकाळ भेटलो. मी या भागात’’ एक नवखा नागरिक आहे असं भासवून शेजारच्या भागात खून झालाय असं कळल्याचे सांगून झालेल्या खुनाची चौकशी केली. “रॉबिन सांगत असतानाच देशमुख मधेच म्हणाले.

“ अरे वाह म्हणजे पाटील डॉक्टरांनी तुला ओळखले नसेलच, तुला त्यांचाकाडून काय माहिती मिळाली. “ देशमुख स्मित करत म्हणाले.

“ मालतीबाई ज्यावेळी जमिनीवर कोसळलेल्या होत्या त्यावेळी डॉक्टर पाटलांना वाड्यावर बोलावलं होतं आणी त्याचवेळी त्यांना असा संशय आला होता कि मालतीबाई यांचा खून झाल्याची शक्यता आहे आणी इतर माहितीच म्हणाल तर मालतीताई यांचाबाद्द्ल समाजात चांगली प्रतिमा नाही, त्यांनी बर्याच लोकांचं आर्थिक वा सामाजिक स्तरावर नुकसान केलेलं आहे. किंबहुना डॉक्टर पाटील सुद्धा याचे बळी ठरलेत असा मला दाट संशय आहे “रॉबिन ने सिगारेट चे थोटूक विझवत बाजूला ठेवले.

“ हम्म आम्हाला सुद्धा लोक बर्यापैकी हेच सांगत होते कि बाई जरा खाष्टच होती, तिच्या फायदाच्या आणी जवळच्या लोकांनाच कामे मिळवून द्यायची. पण डॉक्टर पाटलांना सुद्धा मालतीबाईंचा राग असावा हे विशेष आहे कारण पोलीस चौकशीत तर डॉक्टर पाटील तसं काही असल्याचं दाखवत न्हवते” देशमुख विचारमग्न होत म्हणाले.

“ खुनासारख्या प्रकरणात कोणी पोलिसांना अशा माहित्या देऊन कोण कशाला आफत ओढवून घेईन देशमुख साहेब. डॉक्टर पाटील यांच्या चौकशी नंतर मी त्या भागातल्या बर्यचा लोकांना जसे कि दुकानदार, स्थानिक भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या क्लब मधील मेंबर यांना भेटलो. सगळ्याचं ऐकून मला हे वाटत कि मृत मालती बाईंबद्दल लोकांच मत चागलं नाहीये.” रॉबिन सिगरेट विझवत हाताची घडी घालत टेबलाकडे एकटक पाहू लागला.

“ हम्म .. म्हणजे मालती बाई यांना मारून बर्याच जणांना फायदा होऊ शकतो असं दिसतंय. मालती बाईंना पाण्यात पाहणारा कोणीतरी ज्याचं मालतीबाईचं नुकसान केलं असेल किंवा त्यांचा कोणी राजकारणातील शत्रू हे कृत्य करू शकतो. “ देशमुख म्हणाले.

“ शक्यता नाकारता येत नाही देशमुख साहेब, पण मालतीबाईंचा मृत्यू घरात झालाय. त्यांचा खून करणार्याला त्यांचा घरात जाऊन मारण्यासाठी कोण ना कोणाची मदत घाव्यी लागलेली असू शकते. किंवा तो व्यक्ती घरात आला तसा खून करून बाहेर गेला असं सहजासहजी शक्य होणार नाही, कोणीतरी त्याला नक्कीच मदत केलेली असेल” रॉबिन हात डोक्यामागे घेत वर आढ्याकडे पाहत म्हणाला.

“ शिवाय मालतीबाईंचा मृत्यू सुद्धा विशिष्ट पद्धतीने झालाय, खुन्याने कोणताही मागमूस सोडता हे काम कोणाच्या मदतीशिवाय करण शक्य वाटत नहीये.” देशमुखांनी रॉबिन च्या म्हणण्याला जोड दिली.

“ पण काही प्रश्न हे उरतातच देशमुख, मालतीबाईंचा काटा खुन्याने विशिष्ट पद्धतीने का काढला असेल? असं कोणतं विष त्याने वापरलं असेल ज्याने मालतीबाई तत्क्षणी मृत्युमुखी पडल्या? चाकू भोसकून किंवा रस्त्यावर अपघात करून मालती बाईंना मारणे शक्य असताना हि विशिष्ट पद्धत का वापरली असावी? शिवाय खुन्याने ते विष मालतीबाईंना कस दिलं असेल? “ एकामागोमाग एक प्रश्न उपस्थित करत रॉबिन आपल्या खुर्चीत डोळे मिटून शांत बसला. यावर काही उत्तर नसल्याने देशमुख सुद्धा विचार करत शांत बसले. काही वेळ रॉबिन आणी देशमुख विचारमग्न होऊन शांत बसले.

काही वेळ शांततेत गेला. नंतर त्या शांततेचा भंग करत रॉबिन म्हनला

“ चला देशमुख मला वाटत आता आपण देसाई वाड्यावर जाऊन प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी आणि घरातील लोकांची चौकशी करायला हवी. उर्वरित प्रश्नांनी उत्तरं आपल्याला कदाचित तिथे मिळू शकतात” रॉबिन लगबगीने म्हणाला.

“ हो खरतर त्यासाठीचं मी इथे आलो होतो. मालतीताई यांचे दहन संस्कार होऊन बरेच दिवस झाले आहेत. त्यामुळे तुला टेलिफोन न करता लगोलग तुला घेऊनच देसाई वाड्यावर जावे असा विचार होता” देशमुख जागेवरून उठत म्हणाले.

“ हे एक बरे केलेत तसंही मला सुद्धा तुमची मदत लागेलच तिथे“ रॉबिन म्हणाला.

पुढच्याच क्षणी रॉबिन आणी इ. देशमुख घरातून बाहेर पडले देशमुखांनी खाली उभ्या केलेल्या पोलिसांच्या गाडीत येऊन बसले. गाडीत बसताच देशमुखांनी हवालदाराला आदेश दिला “ चला म्हस्के गाडी आता तडक देसाई वाड्याकडे न्या”

इ. देशमुखांच्या आदेशासरशी हवालदार म्हस्केनी गाडी चालू केली आणी गाडी देसाई वाड्याकडे जाऊ लागली.

क्रमशः

==============================================================================

गुप्तहेर रॉबिन आणी कुटीरोवांचं शस्त्र - भाग ४

  दुपारचं ऊन सरून संध्याकाळ होत आलेली होती. दत्त नगरजवळील वस्तीमध्ये आतल्या गल्ल्यांमध्ये माणसांची जरा वर्दळच होती. उन कमी झाल्याने लहान मुल...